सैन्याचे रणगाडे, तोफा, बंदुका अशा वस्तू समुद्राच्या तळाशी पहायला मि ळाल्या तर… खूप गंमत येईल ना? जॉर्डनमध्ये असंच एक संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. या संग्रहालयात सैन्याचे रणगाडे, हेलिकॉप्टर, बंदुका, बोटी पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे संग्रहालय समुद्राच्या तळाशी आहे. या संग्रहालयात सैन्याची 19 उपकरणं पहायला मिळतील. अकाबा किनार्यावरून हे संग्रहालय पहायला जाता येईल. लाल समुद्रात 28 मीटर म्हणजे 92 फूट खोल हे संग्रहालय उभारण्यात आलं आहे. फक्त सात दिवसात हे संग्रहालय उभारण्यात आलं. इथे येणार्या पर्यटकांना काही तरी धाडसी, वेगळं पाहिल्याचं समाधान मिळावं, समुद्री जीवनासोबतच सैन्याचं वैभव न्याहाळता यावं या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आलं आहे. हे जगातलं पाण्याखालचं पहिलं मिलिट्री संग्रहालय आहे. पर्यटकांना संग्रहालयात पोहोचवण्यासाठी खास बोटी तयार करण्यात आल्या आहेत. खोल पाण्यात जायचं नसेल तर पर्यटक वरूनच हा नजारा बघू शकतात. यासाठी काचेच्या बोटी तयार करण्यात आल्या आहेत. या बोटींमधून समुद्र तळ न्याहाळता येईल. असं हे अनोखं संग्रहालय जॉर्डनची शान ठरणार आहे.