प्राचीन कात्रीचा शोध

0
60

जर्मनीतील एका सेल्टिक थडग्यामध्ये 2300 वर्षांपूर्वीची कात्री तसेच वाकवलेल्या तलवारीचा शोध घेण्यात आला आहे. या थडग्यात पुरातत्त्व संशोधकांना इतरही अनेक वस्तू सापडल्या आहेत. त्यामध्ये चिखलाचा एक भाग, पाते, कमरपट्टा आदींचा समावेश आहे. या थडग्यामध्ये एक पुरूष आणि एका स्त्रीला दफन करण्यात आले होते असे संशोधकांनी म्हटले आहे. युरोपच्या मुख्य भूमित इसवी सनपूर्व तिसर्‍या ते इसवी सनपूर्व दुसर्‍या शतकात सेल्ट लोक राहत होते. हे लोक मृतदेहांचे दहन करून अस्थींचे दफन करीत असत. अशा अस्थींच्या शेजारी त्यांच्या अनेक वस्तू ठेवल्या जात असत. अशाच एका थडग्याचा जर्मनीत शोध घेण्यात आला आहे. त्यामध्ये चांगल्या प्रकारे सुरक्षित राहिलेल्या दोन कात्र्यांचाही समावेश आहे. म्युनिचमधील बेवेरियन स्टेट ऑफिसच्या मार्टिना पॉल या पुरातत्त्व संशोधिकेने याबाबतची माहिती दिली. सध्या जसे अनेक वस्तू कापण्यासाठी कात्री वापरली जाते तशाच या दोन्ही कात्र्या आहेत. याठिकाणी ज्या व्यक्तींचे अवशेष दफन केले आहेत त्या समाजातील संपन्न कुटुंबातील व्यक्ती असाव्यात हे उघडच दिसते. याचे कारण म्हणजे त्यांच्या वापरामध्ये धातूच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे.