नर्सिंग प्रशिक्षणार्थी मुलींना स्टडी टेबल्सचे वाटप

0
22

सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा उपक्रम; गरजू कुटुंबातील मुलींना स्वावलंबी करणार्‍या प्रकल्पाला मदतीचा हात

नगर – सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आयडियल हेल्पिंग हॅण्ड संचलित नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी
मुलींना स्टडी टेबल्स भेट देण्यात आले. तारकपूर येथील बिशप हाऊस परिसरात हे प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. समाजातील गरजू व स्लम भागातील मुलींना स्वावलंबी करण्यासाठी या केंद्रात नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या मुलींच्या शिक्षणात व अभ्यासात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही वेळेची गरज असल्याचे लक्षात घेऊन
सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने टेबल्सची मदत केली. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थी मुलींच्या चेहर्‍यावर देखील आनंद निर्माण झाले होते. कार्यक्रमाला सेवाप्रीत फाउंडेशनच्या संस्थापिका जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख अन्नू थापर, अर्चना गणेश
खंडेलवाल, अनीता मंत्री, सविता बोरा, निलीमा शाह, पूजा बजाज, नेहा भगवानी, पल्लवी रेनाविकार, विनिता छाब्रिया, साक्षी कपूर, अस्मी भगत, दिशा झालानी, राखी चंदे, रश्मी आर्डे, अर्चना पुगलिया, मनीषा थापर, दक्षा मुनोत यांच्यासह आयडियल हेल्पिंग हॅण्डचे निर्मला केदारी, शिवाजी जाधव, संगीता साळवी उपस्थित होते.
निर्मला केदारी यांनी माहिती देताना सांगितले की, आयडियल हेल्पिंग हॅण्ड ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून समाजातील अतिशय दुर्लक्षित व गरजू मुला-मुलींसाठी स्वावलंबनाचे कार्य करत आहे. विशेषतः नर्सिंग क्षेत्रातील मुलींना शिक्षणासाठी लागणारे साहित्य, मार्गदर्शन आणि आधार देण्याचे कार्य संस्थेच्या वतीने करुन त्यांना आत्मनिर्भर केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, महिला आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे. केवळ साक्षर होणे पुरेसे
नाही, तर कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे आवश्यक आहे. नर्सिंग हे क्षेत्र केवळ रोजगारच नाही तर सेवाभावाची
खरी ओळख करून देते. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणार्‍या प्रत्येक मुलींना उज्वल भविष्य मिळणार आहे. सेवाप्रीत सोशल फाउंडेशन समाजातील प्रत्येक दुर्लक्षित घटकाला शिक्षण आणि संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनाने कार्य करत आहे. गरजू व दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कार्य सुरु असून, आज आयडियल हेल्पिंग हॅण्डच्या प्रकल्पाला मदत करण्यात आली आहे. महिला आत्मनिर्भर झाल्या की कुटुंब, समाज आणि देश सक्षम होतो. म्हणूनच महिलांनी कौशल्य आत्मसात करुन आत्मनिर्भर होण्याचे त्यांनी आवाहन केले. अन्नू थापर म्हणाल्या की, आजच्या युगात महिलांना फक्त घरापुरते मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रात सक्षम होणे आवश्यक आहे. सेवाप्रीत सोशल फाउंडेशनकडून महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. नर्सिंग प्रशिक्षण घेत असलेल्या या मुली उद्या समाजातील रुग्णांची सेवा करतील, कुटुंबाची जबाबदारी सांभाळतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील. महिलांना
आत्मनिर्भर करण्यासाठी सेवाप्रीत देखील प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी कविता खंडेलवाल, रितू अग्रवाल, दीपा जाग्गी, मनीषा चुग, अर्चना खंडेलवाल, चंदा खंडेलवाल, लता खंडेलवाल, कृतिका बजाज, अभिलाषा नवंदर, रीना मनियार, हर्षिता बागचंदानी, सपना दर्डा, नीतू आहुजा, वैशाली दगडे, गायत्री लोंढे आदी सेवाप्रीतच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. आयडियल हेल्पिंग हॅण्डतर्फे देण्यात आलेल्या मदतीबद्दल सेवाप्रीतचे आभार मानण्यात आले.