धार्मिक तेढ नव्हे, सलोखा हवा; राजकीय स्वार्थासाठी द्वेषाचे राजकारण करू नये, अहिल्यानगर शहराला कोण वेठीस धरत आहे? प्रशासनाने कठोर कारवाई करावी

0
69

शहराचे वैभव धार्मिक तेढीमुळे धोक्यात : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी

नगर – संतांचा वारसा आणि धार्मिक सलोख्यामुळे प्रसिद्ध असलेले अहिल्यानगर शहर आज धार्मिक तेढीमुळे बदनाम होत चालले आहे. शहराचे हे वैभव नष्ट होऊ नये यासाठी सर्व समाजांनी आत्मपरीक्षण करून एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
बारातोटी कारंजा चौकातील रांगोळी प्रकरण, कोठला येथे झालेले रस्ता रोको आंदोलन आणि त्यानंतरच्या लाठीचार्ज घटनेचा उल्लेख करताना त्यांनी तीव्र निषेध नोंदविला. या अशोभनीय घटनांमुळे व्यापारी, सामान्य नागरिक
त्रस्त झाले आहेत. कित्येक वर्ष शांततेचे प्रतीक असलेले शहर अचानक हिंदू-मुस्लिम भांडणामुळे चर्चेत आले, ही बाब दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. तांबोळी यांनी पुढे सांगितले की, अहिल्यानगर शहरात प्रायोजित स्वरूपाच्या घटना घडवून धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. यामागे कोणती अदृश्य शक्ती कार्यरत आहे याचा शोध घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई करावी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही माजी व भावी लोकप्रतिनिधी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत. सोशल मीडिया व फेक आयडीच्या माध्यमातून भडकावले जात आहे.
अशा घटनांवर तातडीने आळा घालणे आवश्यक आहे. आणि धार्मिक भावना भडकविणार्‍या गुन्ह्यांवर किरकोळ कलमे लावून जामिनावर सोडण्याच्या घटनांमुळे जनतेत नाराजी आहे. वेळोवेळी दिलेल्या निवेदनांची दखल घेतली
गेली नाही. जर वेळेत कारवाई झाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील शांतता परत आणण्यासाठी
मुस्लिम समाज पुढाकार घेत असल्याचे सांगून
तांबोळी म्हणाले की, अहिल्यानगर शहरातील सुज्ञ
नागरिकांनी समाजहितासाठी एकत्र यावे. शांतता,
सलोखा व एकात्मता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी
आम्ही पुढाकार घेण्यास तयार आहोत. राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव
आमदार रोहित पवार व वरिष्ठ नेते लवकरच
विविध समाज बांधवांना एकत्र करून सलोखा
वाढविण्याचे प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती
पत्रकार परिषदेमध्ये हाजी शौकत तांबोळी यांनी
दिली.