दुर्घटनाग्रस्त रासने कुटुंबियांना ४ लाख रुपयांच्या शासनाच्या मदतीचा धनादेश सुपूद

0
108

 

नगर – शहरात २७ मे रोजी पडलेल्या अवकाळी पावसात सावित्रीबाई फुलेनगर (सारसनगर) भागातील संदीपनगर येथील तन्वी केदार रासने या युवतीचा रहात्या घराचा स्लॅब कोसळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी रासने परिवारास शासनाची
मदत मिळावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली. याचा धनादेश आ.संग्राम जगताप, प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांनी तन्वी रासनेचे वडील केदार व आई वैशाली यांच्याकडे शनिवारी सुपूर्द केला. यावेळी भाऊक झालेल्या रासने कुटुंबियांचे डोळे पाणावले.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागणारे व संजय चोपडा, दुर्वेश रासने, अजय कुंभकर्ण आदी उपस्थित होते. शासनाने दिलेल्या या मदतीत अजून भर घालून कै.तन्वी रासने हिच्या स्मरणार्थ सेवाभावी ट्रस्टची स्थापना करून गरीब गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांना मदत करणार असल्याचे केदार रासने यांनी सांगितले.
आ.संग्राम जगताप म्हणाले, २७ मे रोजी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. अशी वेळ कोणावरहीयेऊ नये. पावसाळ्यात  सर्वांनी आपल्या घराची काळजी घेणे आवश्यक आहे. दुर्घटनाग्रस्त रासने परिवारास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती दुर्घटनेमुळे आर्थिक मदत मिळावी यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्यानुसार काही दिवसातच रासने
कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. तन्वीच्या स्मरणार्थ गरीब गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांच्या मदतीसाठी सेवाभावी ट्रस्टची स्थापना करण्याचा रासने परिवाराचा निर्णय योग्य व स्वागतार्ह आहे. अशा सामाजिक उपक्रमांची आज गरज आहे.इयत्ता १२ वीच्या परिक्षेत तन्वी रासने हिने स्वतःच्या हिमतीवर ८५% गुण मिळवले
होते. भविष्यात डॉटर होण्यासाठी नीट परिक्षेच्या निकालाची वाट पाहणार्‍या तन्वीवर दुर्दैवाने काळाने असा घाला घातला आहे.