इंग्रजी भाषेतील स्लिपा मनसे विद्यार्थी सेनाने फाडून शाखाधिकार्यांच्या टेबलावर टाकल्या
नगर – मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा आदर करून बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतून करून सर्व कागदपत्रे, स्लिपा या मराठी भाषेत करा. तसेच बँकेत ८० टक्के कर्मचारी हे स्थानिक मराठी भाषिकच असावेत या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. बँकेचा कारभार जास्तीत जास्त मराठी भाषेतून न झाल्यास पूर्व कल्पना न देता मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे.
पदाधिकार्यांनी सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अहिल्यानगर शहरातील माणिक चौकातील बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखेत आंदोलन करून शाखाधिकार्यांना वरील मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पदाधिकारी आक्रमक होऊन बँकेच्या इंग्रजी भाषेतील स्लिपा फाडून शाखाधिकार्यांच्या टेबलावर टाकल्या. जर बँकेतील सर्व व्यवहार मराठी भाषेतून केले नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे, शहर उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, तालुका अध्यक्ष अक्षय बेरड, तालुका उपाध्यक्ष रोमन भागवत, आकाश गवते, नागापूर विभाग प्रमुख आयुश नागरे आदींसह सैनिक उपस्थित होते.





