अहिल्यानगर हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय झिंजे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी
नगर – चितळे रोडवरील नेहरू मार्केटची प्रत्यक्ष पाहणी करून ती जागा अतिक्रमणमुक्त करून भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी अहिल्यानगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यांच्यासमवेत चंद्रकांत उजागरे उपस्थित होते. आयुक्तांनी निवेदनाची दखल घेत प्रत्यक्ष पाहणीसाठी ७ जानेवारी रोजी येण्याचे आवश्वासन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नवीन वर्षांत आपल्या आदेशाने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे. शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून या मोहिमेचे स्वागतच आहे. त्याचवेळी शहरातील हॉकर्स युनियनचा अध्यक्ष म्हणून आपणासमोर काही वस्तुस्थिती मांडणे आवश्यक आहे. शहरातील चितळे रोडवरील ऐतिहासिक नेहरू मार्केटची इमारत १३ वर्षांपूर्वी नवीन मोठे संकुल बांधण्यासाठी भुईसपाट करण्यात आली. आज तेरा वर्षानंतर येथे काहीच झाले नाही. उलट ही जागा महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयाच्या चुकीचे स्मारक बनली आहे. मनपाच्या मालकीची ही मोकळी जागा ना गाळेधारक भाजीविक्रेत्यांच्या उपयोगाची राहिली ना महापालिकेच्या कामाची राहिली. याठिकाणी सध्या अनेक अतिक्रमणे झाली आहेत. टपर्या टाकण्यात आल्यात. अनेक जण येथे कचरा आणून टाकतात. लघुशंका करण्यासाठी याच जागेचा उपयोग केला जातो. तसेच अनेकांच्या खाजगी चारचाकी, दुचाकी येथे पार्क केलेल्या असतात. संपूर्ण जागाच अतिक्रमणांनी गिळंकृत केली आहे. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यास लगेचच लक्षात येईल. मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक चितळे रोडवरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे. वास्तविक एवढी मोठी मोकळी जागा असताना त्यांना नाईलाजाने रस्त्यावर बसावे लागत आहे. मनपाने या जागेवर पे अॅण्ड पार्क न करता ती जागा अतिक्रमण मुक्त करून दिल्यास भाजी विक्रेते तिथे बसण्यास तयार आहेत. त्यामुळे रस्ताही मोकळा होईल व वाहतुकीला अडथळाही होणार नाही. या जागेची व्यवस्थित साफसफाई करून सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून द्यावे तसेच चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधून दिल्यास भाजी, फळ विक्रेत्यांचा मालही सुरक्षित राहिल. तसेच याठिकाणी लाईटचीही व्यवस्था करावी. त्यामुळे या जागेचा अनधिकृतपणे सुरु असलेला गैरवापरही थांबेल आणि भाजी विक्रेत्यांनाही हक्काची जागा मिळेल. पे अॅण्ड पार्क सारखे धोरण राबवून या परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या सुटणार नाही हे वास्तव आहे. गोरगरीब भाजी, फळ विक्रेत्यांना न्याय मिळावा असे झिंजे यांनी म्हटले आहे





