मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणीचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू

0
35

नगर – मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणीचा भरधाव वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा ते शेवगाव रस्त्यावर भानसहिवरे शिवारात ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सुप्रिया
आदिनाथ पवार (वय १९, रा. भानसहिवरे ता.नेवासा) असे मयत तरुणीचे नाव आहे. मयत सुप्रिया हिचे कुटुंबीय तिचे लग्न
जुळविण्याच्या तयारीत होते. ३ ऑक्टोबर रोजीच तिला पाहुणे पाहायला येणार होते. मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येणार असल्यामुळे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. आई- वडिल सकाळीच उठून घर स्वच्छ, निटनेटके
केले. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. सुप्रिया ही पहाटे उठून शेवगावकडील रस्त्याने मॉर्निंग वॉकला गेली. ती फिरुन घरी येत असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हॉटेल जयराज नजिक घडली. सुप्रिया हिचे इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते. तिला पाहुणे पाहण्यासाठी येण्याचा नियोजित कार्यक्रम ठरलेला होता. त्यामुळे तिचे आई-वडील आणि तिचे तीन भाऊ सकाळीच उठून घरातील आवरासावर करण्यात मग्न होते.
सुप्रिया मॉर्निंगवॉकला गेली व पुन्हा घराकडे परतत असताना भानसहिवरे येथील हॉटेल जयराज नजिक एका अज्ञात वाहनाने तिला पाठीमागून जोराची धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नेवासे फाटा येथील एका
खासगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. शोकाकूल वातावरणात सुप्रिया हिच्यावर अंत्यसंस्कार केले.