नगर – मानवी जीवन सुंदर करण्यासाठी ज्ञान महत्वाचे असून ज्ञान पोहोचविणारे सर्वात प्रभावी माध्यम हे भाषा आहे. मराठी साहित्य खूप समृद्ध आहे. साहित्याकडे प्रत्येकाने डोळसपणे पाहून आपले साहित्य पुढील पिढीपर्यंत
पाहोचविण्याची गरज आहे, जीवन सुंदर आहे या विषयावर मार्गदर्शन करताना व्याख्याते डॉ. गणेश
शिंदे म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला
आहे. सर्वांना आपल्या भाषेविषयी
सार्थ अभिमान असला पाहिजे. ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचविणारी आपली मराठी भाषा
टिकावी, जगाच्या पाठीवर सर्वसामान्यांच्या मनात रुजावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न
करण्याची गरज आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना पुस्तके वाचण्याची
सवयही अंगिकारण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात अभिजात मराठी
भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,
निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, तहसिलदार शरद घोरपडे, प्रमुख व्याख्याते
डॉ. गणेश शिंदे, मराठा भाषा समितीचे सदस्य किशोर मरकड, शशिकांत नजान
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज
आशिया यांनी अभिजात मराठी
गौरव भाषा दिनानिमित्त उपस्थितांना
शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात
किशोर मरकड म्हणाले, जिल्ह्यात
मराठी भाषा समितीमार्फत भाषेचा
प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी
अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करण्यात
येत आहे. राज्यात यामध्ये आपला
जिल्हा अग्रेसर असल्याचे सांगत ३
ते ९ ऑक्टोबर दरम्यान आयोजित
सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन करण्यात आली.
सुत्रसंचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले. शशिकांत नजान यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचार्यांची उपस्थिती होती.
अभिजात मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध
पुस्तकांच्या प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.