नगर – भारतीय आयुर्वेदीय उपचार पद्धती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे.
आयुर्वेद औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यामानाने उपलब्धता
व पुरवठा कमी आहे. त्यामुळे औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीचे
प्रमाण वाढले आहे. रुग्णांना दर्जेदार व शुद्ध आयुर्वेदीक औषधे मिळावेत यासाठी गुणे
आयुर्वेद महाविद्यालयाच्या फामर्सी मध्ये शुद्ध व दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती
केली जाणार आहे. यासाठी मांडवगण गटातील गावांमधील शेतकर्यांना मोफत आयुर्वेद
वनस्पतींची झाडे दिली जाणार असून या सर्व शेतकर्यांकडून आयुर्वेदिक औषधांसाठी
कच्चामाल खरेदी केला जाणार आहे. या आयुर्वेद वनस्पतींच्या संगोपनाचे प्रशिक्षण
गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक शेतकर्यांना देणार आहेत. या उपक्रमामुळे
शेतकर्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळून आर्थिक फायदाही होणार आहे. या अनोख्या
उपक्रमामुळे मांडवगण गटातील १९ गावांची आयुर्वेद वनस्पतींची गावे म्हणून वेगळी
ओळख निर्माण करू, असे प्रतिपादन आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन
जगताप यांनी केले.
अहिल्यानगरच्या गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाच्या
वतीने १० व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिना निमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन व आयुर्वेद
वनस्पतींच्या वाटपाचा शुभारंभ सचिन जगताप यांच्या हस्ते झाले.
यावेळी आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे संचालक रत्नाकर कुलकर्णी, वैशाली ससे,
ज्ञानेश्वर रासकर, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे, उपप्राचार्य डॉ. सुरज ठाकूर, मनापा अभियंता परिमल निकम, प्रतिभा भारदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.समीर
होळकर, माजी प्राचार्य डॉ.संगीता निंबाळकर आदींसह सर्व प्राध्यापक व प्रशिक्षित डॉक्टर
विद्यार्थी उपस्थित होते. यानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात आयुर्वेद
उपकरणांची व उपचारांची माहिती देणार्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
आले होते. या कार्यक्रमात मांडवगण गटातील १९ ग्रामपंचायतींना
आयुर्वेद वनस्पतींच्या वाटपाचा शुभारंभही करण्यात आला. सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच
व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सचिन जगताप पुढे म्हणाले, स्व. अरुणकाका जगताप यांनी शेतकर्यांना कायम
मदत करून त्यांच्यासाठी काय करता येईल याचाच विचार केला. त्यांच्याच विचारावर
पुढे काम करून शेतकर्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न माझा आहे.
गुणे आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय संस्थेच्या माध्यमातून मांडवगण गटातील १९
ग्रामपंचायतींमधील शेतकर्यांच्या बांधावर एक हजार आयुर्वेद वनस्पतींची झाडे लावून
ते संगोपन व वाढवण्याचा उपक्रम सुरू करत आहोत. एका गावात एकाच प्रकारच्या
आयुर्वेद वान्स्पपातींची एक हजार झाडे मोफत देणार आहोत.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे यांनी १० व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिना निमित्त
राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित मांडवगण गटातील विविध गावांच्या सरपंच व पदाधिकार्यांचा
सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रुपाली म्हसे व डॉ.संगीता निंबाळकर यांनी केले.
डॉ. सुरज ठाकूर यांनी आभार मानले.