आधार कार्ड अपडेटसाठी शहरांमध्ये गर्दी

0
54

नगर – शासनाने नुकताच एक शासननिर्णय काढून
सर्व शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बायोमेट्रिक पद्धतीने
नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. या
आदेशामुळे सध्या शहरातील आधार
कार्ड सेंटरवर गर्दी उसळली असून,
अनेक ठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांना
तासनतास रांगेत थांबावे लागत आहे.
काही ठिकाणी तर गोंधळ, ढकलाढकली
व भांडणांचीही वेळ येत आहे. याबाबत
शिवसेना पदाधिकारी काका शेळके यांनी
आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात काका शेळके यांनी म्हटले आहे की, लहान मुलांच्या बायोमेट्रिकसाठी
फक्त काहीच आधार कार्ड केंद्रे उपलब्ध असल्याने शहरात गोंधळ होत आहे.
सकाळपासून रांगेत उभे राहूनही पालकांना आपली वेळ येत नाही. एवढेच नव्हे
तर शाळकरी मुलांना उन्हात उभे राहावे लागते, ही बाब गंभीर आहे. प्रशासनाने
यावर तातडीने लक्ष देऊन शाळांमध्ये स्वतंत्र मशीन बसवून प्रक्रिया सुरू केली, तर
पालकांवरील व विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल.
शेळके पुढे म्हणाले, आधार कार्ड हा मुलांसाठी
आवश्यक दस्तऐवज आहे; पण जेव्हा
शासनाने बायोमेट्रिक प्रक्रिया सक्तीची
केली आहे, तेव्हा पुरेशी सुविधा उपलब्ध
करून देणे हीही शासनाची जबाबदारी
आहे. आज अनेक पालकांना आपल्या
दैनंदिन कामकाजात अडथळा येतो आहे.
गर्दीमुळे काही वेळा वाद निर्माण होत
असून, पोलीस प्रशासनालाही हस्तक्षेप
करावा लागतो. नगरपालिकेने एखाद्या शाळेत दोन-तीन मशीन बसवून विद्यार्थ्यांसाठी
स्वतंत्र आधार केंद्र सुरू केले, तर ही समस्या सुटण्यास मोठी मदत होईल.
याबाबत आयुक्तांकडे पालक व सामाजिक संस्थांकडूनही तक्रारी पोहोचत
आहेत. सध्या शहरातील मर्यादित आधार सेंटरमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत
असल्याने, काका शेळके यांचे हे निवेदन प्रशासनाला योग्य दिशेने उपाययोजना
करण्यास प्रवृत्त करेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.