अरुणकाका जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
294

नगर – विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून दोन वेळा आमदारकी भूषवलेले अरुणकाका जगताप
यांच्या पार्थिवावर २ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नगरच्या अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो काका प्रेमींनी साश्रू नयनांनी शोकाकुल वातावरणात
त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रातील हजारो नागरिक उपस्थित होते. राज्य शासनाच्यावतीने क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सुधीर पाटील व तहसिलदार संजय शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी शोक धून वाजवल्यावर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. मागील सुमारे महिनाभरापासून आजारपणामुळे अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २ मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत
मालवली. त्यानंतर दुपारी त्यांचे पार्थिव भवानीनगर येथील घरी आणण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
सायंकाळी चारच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘अरुणकाका
अमर रहे…’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. गुणे आयुर्वे द महाविद्यालयात काही काळ पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात
आले होते.. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अमरधाम मध्ये अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी अमरधाम मध्ये मोठी गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या शोक सभेत अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांनी
त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.