मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- मेलेला माणूस काही काळाने उठून बसला असे होते का?

0
203

एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना! मृत व्यक्तीला तिरडीवर ठेवताच ती व्यक्ती उठून बसते. सगळ्या नातेवाईकांची धावपळ उडते. मग कळते की, ती व्यक्ती खरोखर मेलीच नव्हती. हृदयाचे ठोके बंद पडले व श्‍वसन बंद पडले. तरीही काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत व्यक्ती जिवंत राहू शकते. या अवस्थेला ‘सस्पेंडेड ऍनिमेशन’ किंवा ‘तात्पुरती मृतावस्था’ असे म्हणता येईल. ही अवस्था योगी-ध्यानधारणा करणारे लोक स्वतःच्या इच्छेने आणू शकतात; पण मेंदूचे रोग, दुखापती, बधिरीकरणानंतर, विजेचा धक्का वा उष्णता, बार्बीट्यूरेट वा अफूची अधिक मात्रा घेतल्याने बेशुद्धावस्थेत गेलेल्या व्यक्तींमध्ये सस्पेंडेड ऍनिमेशन ही अवस्था आढळून येते.

त्यामुळेच मृत्यूचे निदान करताना ते फार काळजीपूर्वक करावे लागते. हृदयाचे ठोके स्टेथास्कोपने तपासून, तसेच श्‍वसनाची क्रिया होते का हे तपासून, पुरेसा वेळ गेल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर व्यक्तीला मृत घोषित करतात. मेंदूच्या कार्याचा विद्युत आलेख घेण्याची सोय असल्यास तो घेतात. 5 मिनिटे मेंदूच्या पेशींनी कोणत्याच प्रकारच्या कार्याचे प्रदर्शन आलेखात न केल्यास (हा आलेख म्हणजे केवळ एक सरळ रेषाच येते) व्यक्ती मृत आहे, असे समजता येते. मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. सस्पेंडेड ऍनिमेशन मधील माणूस पुन्हा जिवंत होतो, कारण तो खरोखर मेलेलाच नसतो. नाहीतर तुम्हाला वाटेल की, ती व्यक्ती नसून भूतच आहे. जगात भूत नसते, हे पक्के लक्षात ठेवा म्हणजे झाले!