‘ओडीएफ प्लस प्लस’ तपासणी पूर्ण आता थ्री स्टारसाठीची तयारी

स्वच्छता सर्वेक्षण 2020 साठी नागरिकांनी सहभाग द्यावा – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर- स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नगर शहराचे स्वच्छता सर्वेक्षण 2020 केंद्र सरकारकडून सुरू झाले आहे. स्वच्छता सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेने केलेल्या स्वच्छता सुविधांची तपासणी (’ओडीएफ प्लस प्लस’ तपासणी) केंद्राच्या पाच जणांच्या पथकाने गुरुवारी (दि.16) पूर्ण केली. आता शहराला थ्री स्टार मिळविण्यासाठी तयारी सुरु असून यात नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरू आहे. नगरमध्येही स्वच्छ सर्वेक्षणची अंतिम तपासणी सुरू झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या थर्डपार्टी संस्थेचे पाच प्रतिनिधी नगरला आले होते. त्यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांतील सुविधांसाठी स्वतंत्र पथकाद्वारे सुरू असलेली ’ओडीएफ प्लस प्लस’ तपासणी गुरुवारी पूर्ण केली. या पथकाने शहरातील 32 सार्वजनिक शौचालयांपैकी 20 शौचालयांतील सुविधा तसेच महापालिकेने फराहबक्ष महालाजवळ केलेल्या मैला प्रक्रिया केंद्राची तपासणी केली. या पथकाचे गुणांकन येत्या आठ दिवसांत अपेक्षित असून, ते स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या तपासणीत ग्राह्य धरले जाणार आहे.

विविध भागांत झाली तपासणी

या पथकाने शहराच्या जुन्या 34 प्रभाग रचनेनुसार ठिकाणांची पाहणी केली. कराचीवाला नगर, यशवंत कॉलनी, मुकुंदनगर, रामचंद्र खुंट, सिद्धार्थनगर, मार्केट यार्ड, विनायकनगर, रेल्वे स्टेशन परिसर, आगरकर मळा परिसरासह अन्य भागात कोठे रस्त्यावर कचरा पडला आहे का, कोठे कचरा कुंडी दिसते का, ड्रेनेज-गटार कोठे तुंबले आहे का, बांधकामांच्या ठिकाणी ग्रीन शेडचे आवरण आहे का याची पाहणी करून तपासणीदरम्यान नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. शहर स्वच्छ आहे का, ओला-सुका वर्गीकरण करून महापालिकेद्वारे कचरा घेतला जातो का, घंटागाड्या कचरा संकलनासाठी नियमितपणे येतात का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे नागरिकांकडून घेऊन त्याचीही माहिती दिल्लीतील यंत्रणेला दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता येत्या काही दिवसात अजून विविध प्रकारची 4 पथके शहरात येणार असून शहराच्या विविध भागांची तपासणी करणार आहेत.

स्वच्छता सर्वेक्षणात 5 प्रकारच्या तपासण्या

शौचालयांतील सुविधा, मैला व्यवस्थापन यासाठीची ’ओडीएफ प्लस प्लस’ तपासणी पूर्ण झाल्यावर आता स्वच्छता सर्वेक्षण 2020, नागरिकांचा सहभाग, थ्री स्टार दर्जा अशा वेगवेगळ्या तपासण्या होणार आहेत. महापालिकेने शहरातील बसस्थानके व अन्य गर्दीच्या तसेच बाजारपेठेच्या परिसरात केलेल्या स्वच्छता कामाची माहिती आधीच केंद्र सरकारला कळवली आहे. या माहितीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी जाऊन स्वच्छता आहे की नाही, याची तपासणी या प्रतिनिधींद्वारे केली जात आहे. या तपासणीचे नियंत्रण दिल्लीतील पथकाद्वारे केले जात असून, त्यांच्याकडून कळवल्या जाणार्‍या ठिकाणी पथकाला जाऊन तेथील स्वच्छतेचे सद्य स्थितीचे फोटो काढून दिल्लीला पाठवावे लागत आहेत.

या स्वच्छता सर्वेक्षण 2020 च्या तयारीसाठी शहरात स्वच्छतेच्या उपाययोजना केल्यामुळे शहर स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे नगरकरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. हे सर्व उपक्रम यापुढेही कायम स्वरूपी राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांचाही फायदा असल्याने प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही महापौर वाकळे यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा