एकाचवेळी तीन सूर्य

कधी कधी नैसर्गिक कारणांमुळे अनोखे दृश्यं पाहायला मिळत असतात. इंद्रधनुष्य हे त्यापैकी सर्वात ‘कॉमन’ उदाहरण धुव्रीय प्रदेशांमध्ये ‘नॉर्दन लाईटस्’ या नावाने ओळखले जाणारे रंगीत प्रकाशांचे झोत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे आकाशात दिसतात. असाच एक प्रकार आता चीनमध्ये घडला आहे. तेथील फुयू शहरात 31 डिसेंबरला वर्षांच्या अखेरीचा मावळता सूर्य लोकांसाठी अविस्मरणीय ठरला. यावेळी आकाशात चक्क तीन सूर्य असल्याचा आभास निर्माण झाला. मध्यमागी मूळ सूर्य आणि त्याच्याभोवती असलेल्या वर्तुळाकार ढगांच्या कडेला दोन्ही बाजूस दोन सूर्यांच्या छटा असा हा अनोखा नजारा होता.

जीलिन प्रांतातील बर्‍याच ठिकाणांवरून आकाशामध्ये असे तीन सूर्य दिसून आले. सुमारे 20 ते 25 मिनिटांसाठी हे दृश्य दिसून येत होते आणि लोक थक्क होऊन ते पाहत होते. अर्थातच यावेळी आकाशात तीन सूर्य नव्हते. सूर्याचेच प्रतिबिंब वातावरणामधील घटकांवर पडून असे दृश्य निर्माण होते. या घटनेला वैज्ञानिक भाषेत ‘अॅटमॉस्फीअर ऑप्टिकल फेनॉमिनन’ असे म्हटले जाते. त्याला सन डॉग किंवा पार्हिलायन असेही म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणातील बर्फाच्या कणांवरून सूर्यकिरणे परावर्तीत होतात. त्यामुळे सूर्याभोवती दोन्ही बाजूला प्रकाशमान गोळे असल्याचा आभास निर्माण होतो. सूर्यापासून उजव्या आणि डाव्या बाजूला अंदाजे 22 अंशांमध्ये हे गोळे दिसतात.