हवेतील मनोरे

एका नगरात एक पुजारी राहत होता. शेतीवाडी नसल्याने तो भिक्षुकीवरच आपला उदरनिर्वाह करीत होता. एकदा पर्वणीनिमित्त एक श्रीमंत यजमान मोठा दानधर्म करीत होते. त्यांनी पुजारीला धान्य भरलेले मोठे मडके दान दिले. यामुळे पुजारीला फारच आनंद झाला. तो घरी गेला. हे धान्य ताबडतोब विकून टाकावे, असा विचार करून तो बाजाराच्या गावाकडे जायला निघाला.

त्याच्या घरापासून बाजाराचा गाव बर्‍याच अंतरावर होता, लांब होता, तरीही तो चालत निघाला. दुपार झाली. रणरणत्या उन्हात त्याचा जीव कासावीस झाला. कोठेतरी विश्रांती घ्यावी; म्हणून इकडे-तिकडे पाहू लागले. तो त्याला कुंभाराचे घर दिसले. तो तेथे गेला. जवळचा भाकरी-तुकडा खाल्ला. ओसरीवर मडके ठेवले. तेथेच कुंभाराचीही बरीच मडकी ठेवलेली होती. हातातील काठीही त्याने तेथे ठेवली आणि जरा आडवा पडला.

पडल्या-पडल्या त्याच्या मनात विचार येऊ लागले. आता हे मोठे धान्याचे मडके बाजारात विकीन. त्याच्या मला दहा मोहोरा मिळतील. मग मी ही कुंभाराची सर्व मडकी विकत घेईन. दान मिळालेले तांदूळ घालून मी ही मडकी विकीन. त्याचे मला आणखी भरपूर पैसे मिळतील. त्याच्या मी इतर काही वस्तू घेईन. त्या विकून आणखी रगड पैसे कमवीन. दान मिळालेल्या वस्तू विकीन.

अशाप्रकारे मला भरपूर धन मिळेल. मी मग मोठा श्रीमंत होईन. मग मी लग्न करीन. मला सुंदर बायको मिळेल. मग मला अनेक मुले होतील. मी ती आपआपसात भांडू लागली की, मी त्यांना या काठीने असा बडवून काढीन, असे म्हणत विचारांच्या तंद्रीतच त्याने जवळची काठी उचलून मुलांना मारण्याचा आविर्भाव केला असता त्या काठीचा घाव त्या मडक्यावर बसून ते धान्य भरलेले मडके फुटून धान्य इतस्ततः सांडले.

तो आणखी काठी फिरवू लागला आणि त्याचे घाव कुंभाराच्या मडक्यांवर बसू लागले, तशी मडकी फटाफट फुटू लागली. कुंभार आतल्या खोलीत विश्रांती घेत होता. बाहेरच्या आवाजाने जागा झाला. बाहेर येऊन बघतो, तो फुटलेल्या मडक्यांचा ढीग. कुंभार फारच संतापला. त्याचे मोठे नुकसान झाले होते. त्याने तंद्रीत असलेल्या पुजारीच्या हातातील काठी हिसकावून घेतली व त्याच काठीचा प्रसाद पुजारीला सटासट हाणला.

काठीचा मार बसताच ब्राह्म तंद्रीतून जागा झाला. समोरचे दृश्य पाहून ऊर बडवीत रडू लागला. पण आता काय उपयोग? कुंभाराने त्याला हाकलून लावले.

तात्पर्य – अशक्य वाटणार्‍या गोष्टीचे हवेत मनोरे बांधू नयेत. अवास्तव मनोराज्ये खरी नसतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा