सख्या भावाच्या अंत्यविधीला न जाता महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार नगरकरांसाठी बजावताहेत कर्तव्य

अहमदनगर – अहमदनगर महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचे मोठे बंधू चंद्रकांत मायकलवार (वय ६५) यांचे सोलापूर येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. आपला सख्खा भाऊ गेल्याची वार्ता समजली पण त्याच वेळी नगर शहरात एकाच दिवसात ५ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे समजल्यावर नगर शहरातील जनतेची काळजी घेणे महत्वाचे असा विचार करत त्यांनी भावाच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नगरकरांना सुरक्षा पुरविण्यास प्राधान्य दिले आहे. आधी कर्तव्य मग घर आणि परिवार असा विचार करणाऱ्या आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या कार्याला सलाम…

खरे तर अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर पदभार घेण्यासाठी नगर शहरात आलेल्या आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पुन्हा घरी जाता आलेले नाही. त्यांनी १६ मार्च रोजी नगरला येवून आयुक्त पदाचा पदभार घेतलेला आहे. त्यानंतर अवघ्या २ दिवसांनी १९ मार्च पासून नगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश व त्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन झालेले आहे. तेव्हापासून आयुक्त श्रीकांत मायकलवार हे नगर शहरवासियांसाठी कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा परिवार सोलापूर येथे आहे.मात्र २ महिन्यापासून ते परिवारापासून दूर आहेत.

नगर शहरात सुभेदार गल्लीत मंगळवारी (दि. १२) एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांतील काही अहवाल बुधवारी (दि.१३) प्राप्त झाले. यात आणखी चार जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. तसेच सारसनगर भागातही एक व्यक्ती कोरोना बाधित आढळली. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु असताना आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना सोलापूरहून कुटुंबातील व्यक्तीचा फोन आला आणि त्यांचे मोठे बंधू चंद्रकांत मायकलवार (वय ६५) यांचे सोलापूर येथे हृदयविकाराने निधन झाले आहे, अशी माहिती दिली. त्यावेळी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात काय उपाययोजना करायच्या याबाबत आयुक्त मायकलवार हे विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. हि माहिती समजल्यावर काही अधिकाऱ्यांनी त्यांना साहेब तुम्हाला बंधूच्या अंत्यविधीला जाणे आवश्यक आहे असे सांगितले पण जे झाले आहे, त्याचा विचार करण्याऐवजी जे होवू नये हे पाहणे महत्वाचे असे सांगत त्यांनी घर आणि कुटुंबपेक्षा कर्तव्य महत्वाचे. संपूर्ण नगर शहरच माझे कुटुंब आहे. त्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. चला कामाला लागा अशा सूचना त्यांनी दिल्या. हे पाहून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

आपल्या सख्या भावाच्या अंत्यविधीला न जाता नगरकरांसाठी कर्तव्य बजावणाऱ्या आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या विषयी असलेला आदर अधिकच वृद्धिंगत झाला असल्याची भावना काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नगरकरांनो यातून काहीतरी धडा घ्या

महापालिका प्रशासन गेल्या २ महिन्यांपासून नगर शहरातील प्रत्येक नागरिक कोरोनापासून सुरक्षित राहावा, म्हणून धडपड करत आहे. महापालिकेचे दररोज सुमारे १५०० अधिकारी- कर्मचारी जीवावर उदार होवून नगरकरांना विविध सुविधा देण्यासाठी राबत आहे. या प्रशासनाचा प्रमुख असलेले आयुक्त मायकलवार यांनी २ महिन्यांपासून कुटुंबाचे तोंड पाहिलेले नाही. आपल्या सख्या भावाच्या अंत्यविधीला न जाता ते नगरकरांसाठी कर्तव्य बजावत आहेत. हे सर्व कोणासाठी चालले आहे. नगरमधील नागरिकांसाठीच ना ? मग नगरकरांनो यातून तुम्ही काही धडा घेणार का ? प्रशासन सांगतेय घरात राहा तर तुम्ही विनाकारण बाहेर का पडताय ? तुम्हाला तुमच्या जीवाची, कुटुंबाची काळजी वाटत नाही का ? नसेल वाटत तरी किमान जे तुम्ही सुरक्षित राहावेत म्हणून घर दार, कुटुंब सोडून, आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र राबताहेत त्यांच्या साठी, ते आपल्या रक्ताचे पाणी करत आहेत त्यासाठी तरी घरात रहा….

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा