शिवजयंतीनिमित्त नगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

अहमदनगर- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती बुधवारी (दि.19) साजरी होत असून त्यानिमित्ताने नगर शहरासह परिसरात विविध संस्था व संघटनांच्यावतीने वेगवेगळे उपक्रम, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातून बुधवारी सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सर्व जाती-धर्मीयांनी, अबाल-वृद्धांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केले आहे.

‘शिव दवंडी’ चे आयोजन

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या स्माईलींग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने मंगळवारी शिवजयंतीचा शिवदवंडी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता हुतात्मा चौथे शिवाजी महाराज स्मारकात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात 18 व्या शतकातील शिवप्रतिमा देवून मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती स्माईलींगचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली. तसेच बुधवारी शिवजयंतीनिमित्त बैलगाडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये शिवराय व मावळ्यांच्या वेशात विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

लोककला महोत्सवाचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र, रयत प्रतिष्ठान, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, महिला व बालविकास कार्यालय, जय युवा अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकरोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बुधवारी दिवसभर लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ‘बेटी बचाव बेटी पढाव’, मतदार जागृती, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, कायदेविषयक मार्गदर्शन याबरोबरच लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

अवयवदान संकल्प कार्यक्रम

शहरातील मावळा प्रतिष्ठान व साईदीप हेल्थ केअर अॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने शिवजयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी 6 वाजता दिल्लीगेट येथे अवयवदान संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याची आवाहन मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे यांनी केले असून अधिक माहितीसाठी (मो.9028075677) वर संपर्क साधावा.