शिक्षक परिषदेच्यावतीने शाळा महाविद्यालय सुरू करण्याबद्दचा संभ्रम दूर करण्याची मागणी

शाळा सुरु होत असल्याच्या संभ्रमित वातावरणाने पालक, विद्यार्थी व शिक्षक चिंतीत

अहमदनगर- शाळा महाविद्यालय सुरू करण्याबद्दल निर्माण झालेला संभ्रम दूर करून पालक विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री ना. रमेश पोखंरियाल निशंक यांनी शाळा आणि महाविद्यालय 15 ऑगस्ट नंतर सुरू करण्यात येणार असल्याची नुकतीच घोषणा केली. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या गोष्टींची दखल घेऊन राज्य शासनाने निर्णय घेणे अपेक्षित आहे.

कोरोना संकटामुळे राज्यातील जनतेचे काम धंदे बंद झाले, नोकर्‍या गेल्या, यामुळे आर्थिक स्त्रोत संपुष्टात आले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे सुद्धा कठीण झाले आहे. राज्यातील जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात नैराश्य निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कसा करावा? तसेच शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जीविताची चिंता त्यामुळे राज्यातील पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त मानसिकतेत आहे.

शाळा महाविद्यालय सुरू करण्याबाबत व ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य संबंधित पदाधिकारी वेगवेगळे विधाने करीत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समाजाला, पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना चिंतामुक्त करण्यासाठी तसेच निराशेच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी शाळा महाविद्यालय सुरू करण्याबाबतची घोषणा करणे तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबत धोरणात्मक निर्णय घेणे अत्यावश्यक बनले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने शाळा महाविद्यालय सुरू करण्याबद्दल निर्माण झालेला संभ्रम दूर करून पालक विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा