साहित्य सहवास – ‘इनबॉक्स’

पहाटे 5 वाजता उठला. देहधर्म उरकले. किशोरदांची दोन गाणी ऐकली. चारचाकी घेऊन निघाला. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली. बागेत आला. विविधरंगी फुलं पाहिली. मनभरुन गुलाबाचा सुगंध घेतला. पेन्शनर्स कट्ट्यावर आला. दोघांचं बोलणं ऐकलं ‘‘मी खरंच भाग्यवान आहे. माझी सुन, माझी खुप काळजी घेते. ती माझी सुन नाही तर मुलगीच आहे.‘‘

दुसरा म्हणाला की, ‘‘माझ्या मुलाला अनेकदा सांगितलं. पण माझं ऐकतच नाही. अगदी नकोशी झालंय जगणं’’ बागेतुन बाहेर आला. गाडी घेऊन निघाला. रस्त्यामध्ये एक रिक्षा थांबलेली. खाली उतरला. पाहिलं. शाळेची मुलं घेऊन जाणारी रिक्षा. रिक्षावाल्याला स्वतःचा परिचय सांगुन अडचणीत सहकार्य करायलाच हवं असं म्हणुन ह्याने ती पाच मुलं स्वतःच्या गाडीत घेतली. त्याक्षणी रिक्षावाल्याचा तो प्रसन्न चेहरा, त्याला खूप काही सांगु लागला.

एका मुलाने त्याचे आभार मानले. ‘‘आज आमची परिक्षा आहे आणि त्यातच रिक्षा पंक्चर झाली. पण बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. आम्हाला सहकार्य केलंत.’’ तो म्हणाला की, ‘‘असे प्रसंग व्हायलाच हवेत तेव्हाच आपण स्वतःला जास्त ओळखू शकतो.’’ त्याने मुलांना शाळेजवळ सोडले. परिक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. निघाला.

एका टपरीवर आला. चहा घेतला. कॉलेजची काही मुलं, मुली तिथं समुहा-समुहाने गप्पा मारत चहा पीत असलेली त्याने पाहिली. पाचच मिनिटांत दोन मुलाचं आपापसांत भांडण सुरु झालं. शिव्यांची लाखोली ऐकु येऊ लागली. इतर मुले भांडण सोडवण्याचा प्रयत्न करु लागली. तो त्यांच्याजवळ आला. भांडणारांपैकी एकाच्या मुस्काडात मारली. ह्याची भर भक्कम शरिरयष्टी पाहून भांडणारे गप्प झाले. बाकीची मुलं, मुली निघुन गेली. चहाचे पैसे देऊन तो निघाला. रस्त्याकडेच्या झोपडीजवळ एक शाळकरी मुलगा रडत बसलेला त्याने पाहिला. गाडी थांबवुन तो त्याच्याजवळ आला. मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. मुलाने त्याच्याकडे पाहिलं. त्याने रडण्याचं कारण विचारलं.

तेव्हा मुलाने सांगितलं की, ‘‘क्लासची फी भरण्यासाठी पैसे नाहिहेत.’’ ह्याने पाकिटातुन पाचशेची नोट काढुन मुलाच्या हातावर ठेवली. पैसे घ्यायला मुलाने नकार दिला. त्याने फारच आग्रह केला तेव्हा मुलाने पाचशेची नोट घेतली पण म्हणाला की, ‘‘शिकुन मी मोठा होणार, तुमचे हे पाचशे रुपये देणारच मामा.’’

त्याने मुलाचं डोकं गोजारलं. निघाला. गाडी घेऊन तो एका निर्जनस्थळी आला. गाडी थांबवली. एका भल्या मोठ्या दगडावर बसला. दोन्ही डोळे मिटवुन घेतले. स्वतःशी संवाद साधु लागला. प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनात बरंच काही घडत असतं कधी स्वतःच्या बाबतीत तर कधी इतरांच्या बाबतीत, स्वतःच्या समोर. आपल्यामध्ये नेमकं काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. कारण जे आपण घेणार त्यामधुनच आपण नेमकं काय होणार हे ठरतं. आपल्या मनाचा इनबॉक्स सकारात्मक, प्रेरणादायी आनंदी कृती, विचारांनीच भरलेला असायला हवा. हा इनबॉक्सच आपल्याला खर्‍या अर्थाने घडवत असतो, आपण घडत असतो.

आजच्या घटनांमध्ये- बागेतल्या गुलाबाचा तन मन प्रसन्न करणारा सुगंध, सुनेला माझी मुलगीच आहे म्हणणारा सासरा, माझ्या वेळेवरच्या सहकार्यामुळं आनंदी झालेला रिक्षा ड्रायव्हर, विद्यार्थी. माझ्या धिप्पाड देहयष्टीचा भांडण सोडवण्यासाठी केलेला उपयोग, क्लासची फी भरण्याकरिता मी दिलेले पैसे परत करणारच हे सांगणारा मुलगा- हेच मी, माझ्या मनात (इनबॉक्स) ठेवणार, इतर सगळं डिलिट करणार. वाईट विचार, कृती माझ्या इनबॉक्समध्ये नकोच. इनबॉक्सच आपलं जगणं खर्‍या अर्थाने समृध्द, अर्थपूर्ण करत असतो. इनबॉक्समध्ये चांगलंच असणं अत्यंत गरजेचं, महत्वाचं आहे. वेळ मिळेल तेव्हा मी, माझ्या इनबॉक्समधलं सकारात्मक, प्रेरणादायी, आनंदी विचार, कृती आठवत असतो-तन आणि मन प्रसन्न राहण्यासाठी. तुम्ही करालना हे असं ?

 सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार, अ.नगर.

मो. 9822758383