शस्त्राचा धाक दाखवून व्यापार्‍यास लुटले

अहमदनगर- चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून सहा अनोळखी इसमांनी दुकानातील 70 हजार रुपये व 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरुन नेला. ही घटना कोपरगाव येथील संभाजी सर्कल मोरे कॉम्प्लेक्स मधील कोठारी सेल्स् कॉर्पोरेशन या दुकानात मंगळवारी (दि.17) रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रविण शोभाचंद कोठारी (वय 60, रा.कृषिमित्र हौसिंग सोसा., इंदिरा पथ, कोपरगाव) हे त्यांच्या कोठारी सेल्स् कॉर्पोरेशन या दुकानात असताना सहा अनोळखी इसम दुकानात आले. त्यांनी कोठारी यांच्यासह दुकानातील कामगारांना चॉपर व पिस्तुलचा धाक दाखवून गल्ल्यातील 70 हजार रुपये व 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी प्रविण कोठारी यांच्या फिर्यादीवरुन कोपरगाव पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 395 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 प्रमाणे दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.