पाणलोट क्षेत्रात सरासरी ओलांडली असली तरी नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा

आता परतीच्या पावसावरच आशा अन्यथा करावा लागणार भीषण दुष्काळाचा सामना

नगर- जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे या मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असून पावासाने सरासरी गाठली आहे. मात्र जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अल्प पावसावर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या असल्या तरी पिक हाती येईलच याची शाश्‍वती नसल्याने बळीराजा चिंतातुर असल्याचे चित्र अनेक भागात दिसून येत आहे.

दरवर्षी पावसाळा साधारण 1 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीचा असतो. यावर्षी जिल्ह्यात अनेक भागात मान्सुनपुर्व पावसाने दांडी मारली. मात्र मान्सूनचे आगमन झाल्यानंतर उशिराने का होईना उत्तर नगर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा धरण 100% भरलेले आहे. मुळा धरणही 95% भरले असून निळवंडे धरणात तब्बल 90% पेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे. आढळा प्रकल्पही 100% भरला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पाहता अकोले तालुक्यात सरासरीच्या 203% पाऊस गेल्या 3 महिन्यात बरसला आहे. त्या खालोखाल संगमनेर तालुक्यात 91.93%, कोपरगाव तालुक्यात 89.50%, नेवासा तालुक्यात 87.33% तर नगर शहर परिसरात 72.48% पाऊस झाला आहे. हे मोजकेच तालुके वगळता इतर भागात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने आणि पावसाळ्याचे 3 महिने उलटले असल्याने यावर्षीही पुन्हा भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागेल की काय? या चिंतेत बळीराजा आहे. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर, पाथर्डी, शेवगाव तसेच उत्तरेतील राहाता, श्रीरामपूर या तालुक्यांमध्येही यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नगर तालुक्याची पावसाची टक्केवारी जरी जास्त दिसत असली तरी हा पाऊस नगर शहर परिसरात बरसलेला आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. दक्षिण नगर भागातील मांडओहोळ प्रकल्प अवघा 22.78% भरला आहे. घाटशीळ पारगाव प्रकल्पात तर 0% पाणीसाठा आहे. खैरी प्रकल्प अवघा 2.23% तर सीना धरण अवघे 8.24% भरलेले आहे. त्यामुळे याभागातील दुष्काळ अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. दक्षिण भागात शेतकर्‍यांनी अल्पशा पावसावरच खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात मुग, बाजरी ही पिके जळून गेली आहेत. काही ठिकाणी रिमझीम पावसावर पिके तरली आहेत. मात्र त्यातून उत्पन्न मिळेल की नाही याची शाश्‍वती नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

जिल्ह्यातील 45 मंडलात पावसाची प्रतिक्षा

जिल्ह्यात असलेल्या 96 महसुल मंडळापैकी 51 महसुल मंडळात समाधानकारक पाऊस झाला असला तरी सुमारे 45 मंडलांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. अकोले तालुक्यातील अकोले, राजूर, शेंडी, ब्राह्मणवाडा, समशेरपूर, कोतुळ, विरगाव, साकीरवाडी या मंडलांमध्ये सरासरीपेक्षा जास्त झाला आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील कोपागाव, पोहेगाव, सुरेगाव, दहिगाव बोलका, रवंदे, संगमनेरमधील संगमनेर, धांदरफळ, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासने. श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा, कोळगाव., कर्जत तालुक्यातील राशीन, जामखेड तालुक्यातील जामखेड, खर्डा, श्रीरमपूर तालुक्यातील श्रीरामपूर, टाकळीभान, राहुरी तालुक्यातील राहुरी, वांबोरी, ब्राह्मणी, टाकळीमियॉं, राहाता तालुक्यातील राहाता, पुणतांबा, नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपुर, कुकाणा, घोडेगाव, सोनई, नगर तालुक्यातील नालेगाव, केडगाव, रुईछत्तीसी, चिचोेंडी पाटील, सावेडी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, टाकळीमानुर, शेवगाव तालुक्यातील शेवगाव, भातकुडगाव, पारनेर तालुक्यातील पारनेर, वाडेगव्हाण, सुपा या महसुल मंडळातच सरासरी गाठण्याजोगा पाऊस झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

परतीच्या पावसाकडे लागले डोळे

नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे या भागात मान्सुनचा पाऊस अत्यल्प प्रमाणात होत असला तरी परतीचा पाऊस चांगला बरसत असतो. गतवर्षी मात्र पावसाने दगा दिल्याने जिल्ह्याला प्रचंड दुष्काळाच्या यातना सहन कराव्या लागल्या होत्या. यावर्षी जिल्ह्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी बहुतांश भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. परतीचा पाऊस जर बरसला नाही तर भीषण दुष्काळाला सामोर जावे लागणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा