गुन्हा दाखल करण्यासाठी ‘त्या’ मठातील मयत पोलिसाच्या पत्नीची पोलिस महानिरीक्षकाकडे धाव

मठाची जागा सील करावी; खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सीआयडीकडे द्यावा

अहमदनगर- राज्य राखीव पोलिस दलातील जवान प्रमोद राऊत यांच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून दिरंगाई केली जात आहे. मृतदेहाच्या पंचनाम्यात हलगर्जीपणा झाला आहे. सदर प्रकरणी मठातील संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात यावा. तसेच गुन्ह्याचा संपूर्ण तपास होईपर्यंत सदर मठाची जागा सील करण्यात यावी, अशी मागणी मयत प्रमोद यांच्या पत्नी प्रिया राऊत यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात प्रिया राऊत आणि त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी (दि.15) नाशिक येथे जाऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, कल्याण रोडवरील एका मठात 7 फेब्रुवारी रोजी माझे पती प्रमोद राऊत मयत झाले. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात करुन खून झाला आहे. पतीच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद देण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्याद घेण्यास नकार देण्यात आला आहे. माझे पती पोलिस खात्याच्या सेवेत होते. त्यांना फोन करुन मठात बोलविण्यात आले होते. तेथे मठातील व्यक्तीबरोबर वाद झाल्यानंतर मठातून बाहेर पडू दिले जात नसल्याचे पतीने मला सांगितले होते. त्यानंतर रात्री 10 वा. च्या सुमारास माझ्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मला देण्यात आली. मठातील काही सेवेकरी मला दौंडवरुन नगर येथे घेऊन आले. पतीच्या मृत्यू पश्‍चात चांगली रक्कम मिळेल म्हणून मृत्यूचे कारण साप चावल्याचे देण्यात आल्याचे सेवेकर्‍यांनी मला सांगितले. त्यामुळे माझा संशय बळावला. त्यामुळे अधिक चौकशी केल्यानंतर माझ्या पतीला मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

ज्या दिवशी माझ्या पतीचा खून झाला, त्या दिवशी मठात प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. त्यामुळे माझ्या पतीचा नरबळी दिला असल्याचा संशय आहे. या गंभीर स्वरुपाच्या घटनेसंदर्भात पोलिस ठाण्यात वारंवार चकरा मारुनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ चालवली आहे. तरी सदर प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा तसेच मठाची जागा सील करावी, अशी मागणी प्रिया राऊत यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

सीसीटिव्ही फुटेज देण्याची मागणी

प्रमोद राऊज यांच्या पत्नी प्रिया राऊत यांनी शुक्रवारी (दि. 14) तोफखाना पोलिसांना अर्ज सादर केला. 7 फेबुवारी रोजी प्रमोद यांचा मृतदेह साईदिप हॉस्पिटल त्यानंतर सिव्हील हॉस्पिटल येथे पोस्टमार्टम करतेवेळी आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळेपर्यंतच्या सर्व घटनांचे सीसीटिव्ही फुटेज आमच्या ताब्यात द्यावेत, अशी मागणी प्रिया यांनी या अर्जाद्वारे केली आहे.

पंचनाम्यातील त्रुटीचा खुलासा करण्याची मागणी

पती प्रमोद यांच्या पोस्टमार्टम करतेवेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात त्यांच्या अंगावर असणार्‍या मारहाणीच्या खुणा तसेच शरीरावर गोंदवलेल्या भागाचे वर्णन नमूद करण्यात आलेले नाही. तरी याबाबत पोलिसांनी खुलासा करावा. तसेच पुरावा नष्ट करणार्‍या संबधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी प्रिया राऊत यांनी अर्जाद्वारे पोलिसांकडे केली आहे.

मृतदेह पडलेल्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी केला खड्डा

कल्याण रोडवरील त्या मठाच्या परिसरात ज्या ठिकाणी प्रमोद राऊत यांचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी मोठा खड्डा खोदल्याचे शनिवारी (दि.15) उघडकीस आले आहे. सदर जागेवर खड्डा खोदण्यामागचे नेमके गौडबंगाल काय? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा