‘ओबीसी’ समाजाचा विश्वासघात करणार्‍या आघाडी सरकारविरोधात भाजपाचे आंदोलन

अहमदनगर- ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणार्‍या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही श्री. मुंढे यांनी केली आहे. अरुण मुंढे यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणार्‍या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे.विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणार्‍या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणार्‍या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, अशी मागणी मुंढे यांनी केली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे 15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही श्री.मुंढे यांनी नमूद केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा