श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर ग्रुपच्यावतीने -कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ट्रक चिपळूणला रवाना

अहमदनगर – कोकणातील महाड, चिपळूणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने त्यांना सावरण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शहरातील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर ग्रुप या सामाजिक संस्थांच्यावतीने मिशन मानवता अभियान अंतर्गत चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू, किराणा सहित्य, अन्न-धान्य, स्वच्छता साहित्य, कपडे, कोरोना संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर आदी वस्तूंची ट्रक मदत घेऊन नुकतीच रवाना झाली. या मदतीबरोबर संस्थेचे स्वयंसेवक रवाना झाले असून, ते महिनाभर थांबून गरजूंना भोजनासह विविध प्रकारची मदत देणार आहेत. डॉ. अविनाश मोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मदत घेऊन हा ट्रक चिपळूणला पाठविण्यात आला. यावेळी यावेळी नंदेश शिंदे, संजय खोंडे, अविनाश मुंडके, श्री अमृतवाहिनीचे संस्थापक दिलीप गुंजाळ, हेल्पिंग हॅण्ड्सचे प्रवर्तक नाना भोरे, सिराज शेख, राजेंद्र माळू, मनोज गुजराथी, कोहक सर, किशोर कुलकर्णी, श्रीकांत शिरसाठ, शुभांगी माने, पल्लवी हिवाळे, सुशांत गायकवाड, ऋतिक बर्डे, प्रसाद माळी, मच्छिंद्र दुधवडे, क्षितिजा गुंजाळ, जीवन राठोड, अनिकेत जगताप, सचिन सरकटे, अमोल रोहकले, महादेव लांबतुरे आदींसह दोन्ही संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

स्वयंसेवक पूरग्रस्तांना मदत देऊन महिनाभर चिपळूण येथील खेर्डी या भागात राहून कोकण किचन हा उपक्रम राबविणार आहेत. येथील गरजू घटकातील नागरिकांना दोन वेळचे जेवण निशुल्क वाटप करणार आहे. तसेच गरजेप्रमाणे इतर मदत देखील उपलब्ध करुन देणार आहे. या मानवतेच्या उपक्रमासाठी अजूनही मदतीची गरज असून, संस्थेला प्रेमदान चौक येथील हेल्पिंग हॅण्ड्सच्या सेंटरमध्ये मदत देण्याचे आवाहन प्रवर्तक नाना भोरे यांनी केले आहे. डॉ. अविनाश मोरे म्हणाले की, पूराच्या प्रलयाने कोकण भागातील नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. पूरग्रस्त बांधवांना मदत देण्याची गरज आहे. संकटात अडकलेल्या आपल्या बांधवांना धीर देण्यासाठी ही मदत पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन संस्थेने घेतलेल्या पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीप गुंजाळ यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाने देखील कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली आहे. ही मदत खर्‍या गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी मिशन मानवता अभियान प्रयत्नशील आहे. यासाठी स्वयंसेवक त्या भागात महिनाभर थांबून सेवा देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रेमदान चौक येथे हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर ग्रुपच्यावतीने भुकलेल्यांना दोन वेळचे जेवण देण्याचा उपक्रम सुरु आहे. तर श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ निराधार वंचित रस्त्यावर फिरणारे मनोरुग्णांवर उपचार करुन त्यांच्या पुर्वसनाचे कार्य करीत आहे. कोकणातील पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. या मिशन मानवता अभियानासाठी शहरातील दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. पुणे येथील उद्योजक विजय कुलकर्णी व नगरच्या इनरव्हिल क्लबने मदत दिली आहे. तसेच डोंगरगण येथील श्री ज्ञानेश योग आश्रमच्यावतीने एक टेम्पो किराणा साहित्य व कपडे देण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा