प्रपंचावरील माया भगवंताला अर्पण केल्यावर भगवंत भेटतोच – ह.भ.प. विलासबुवा गरवारे

महाजनगल्ली, गायत्री मंदिरात किर्तन सोहळा

अहमदनगर- प्रपंचावरील माया भगवंताला अर्पण केल्यावर भगवंत भेटतोच, असे ह.भ.प. विलासबुवा गरवारे यांनी सांगितले. येथील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात श्रीरामदास स्वामी पादुका दौरानिमित्त सुरू असलेल्या किर्तन सोहळ्यात ते बोलत होते.

विलासबुवा गरवारे पुढे म्हणाले, श्रीसमर्थांनी सावधान शब्दाचा अर्थ ओळखला होता. सा म्हणजे साधूता, व म्हणजे वर्तमानकाळाचा वेध घेण्याची शक्ती, धा म्हणजे धारणा पक्क्या होणे आणि न म्हणजे नम्रता. सावधान म्हणजे नेमके काय? हे लक्षात घेता आपल्या सर्वांना सावध करण्याचे कार्य श्रीसमर्थ करतात, याची जाणिव होते.

स्वतः प्रपंच न करता श्रीसमर्थांनी आधी प्रपंच करावा नेटका हे सांगितले. श्रीसमर्थांसह कोणत्याही संतांनी प्रपंच सोडा, असे सांगितले नाही. प्रपंच नेटका केल्यानंतर मन प्रपंचामधून निघण्यासाठी त्यास मना सज्जना भक्तिपंथेचि जावे, असे श्रीसमर्थ सांगतात. प्रपंच करून परमार्थ करताना कर्तेपणा श्रीरामाला द्यावा. तोच सर्व भार वाहतो, या श्रध्देने प्रपंच केल्यास परमार्थ सहज प्राप्त होतो. संत गोरोबा कुंभार यांनी प्रपंचातील दुःखाचा सर्व भार पांडुरंगावर सोपवला. त्या दृढ निष्ठेमुळे भगवंत स्वतः गोरोबाकाकांचे घरी दास म्हणून राहिले. भगवंत आपल्या भक्ताचा सांभाळ कसा करतात? हे विलासबुवा गरवारे यांनी किर्तनाच्या आख्यानात रसाळपणे निरूपण केले.

आपले मन प्रपंचामधून निघत नाही म्हणून परमेश्वरचरणी लीन होत नाही. मनाला एकदा भगवंताच्या नामाचा अनुभव आला की ते बदलत नाही. त्यासाठी सतत नामचिंतन करण्याचा संदेश ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिला आहेच. भजनात आणि नामात समाधानच मिळते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवंताने ठेवले तसेच रहावे. चित्ती असू द्यावे समाधान असे सांगितले आहे.

रवीला दोरी लावून ताक घुसळण्याच्या काळात गृहिणी आरोग्यदृष्ट्या तंदुरूस्त असायच्या. आता झटपट आवरण्यासाठी मिक्सर आला. कामे लवकर आटोपत असली तरी खास वेळ काढून व्यायाम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. श्रीसमर्थांसारखे सद्गुरू मिळणे व त्यांची कृपा लाभणे हे फार भाग्याचे.

आपल्या प्रपंचामधून वेळ काढून जीवनात एकदा तरी दासबोधाचे वाचन करा. श्रीसमर्थांच्या पादुका आपल्या शहरात आल्या आहेत. या चरण पादुकांचे दर्शन घेऊन आपल्या जीवनाची बॅटरी चार्ज करून घ्या, असे आवाहनही विलासबुवा रामदासी यांनी केले.

संयोजन समितीच्यावतीने समर्थभक्त मंदारबुवा रामदासी व सनातन धर्मसभेचे अध्यक्ष दत्तोपंत पाठक गुरूजी यांच्या हस्ते विलासबुवा रामदासी यांना सन्मानित करण्यात आले. किर्तनास अलोट गर्दी होती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा