फिट इंडिया उपक्रमांतर्गत केडगावमध्ये विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून दिला सदृढ आरोग्याचा संदेश

नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व रसिक रंजन कला अविष्कार संस्थेचा उपक्रम

अहमदनगर- निरोगी व सदृढ आरोग्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. उत्तम आरोग्य पैश्याने विकत मिळत नाही तर मैदानावर प्रत्येकाने उतरले पाहिजे. सदृढ आरोग्य हीच खरी धनसंपदा असून, युवकांमध्ये याविषयी जागृती होण्याची गरज असल्याची भावना क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने यांनी केले.

नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व रसिक रंजन कलाविष्कार बहुद्देशीय संस्थेच्यावतीने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त फिट इंडिया उपक्रमांतर्गत केडगाव येथील डॉ.हेगडेवार संस्थेच्या सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा अधिकारी रासने बोलत होते. यावेळी नेहरु युवा केंद्राचे वरिष्ठ लेखाधिकारी देविदास साळवे, रमेश गाडगे, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड.महेश शिंदे, आधारवड संस्थेच्या अध्यक्षा अॅड. अनिता दिघे, नयना बनकर, सिमोन बनकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भोर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, क्रीडा शिक्षक अविनाश साठे रसिक रंजनचे अध्यक्ष डॉ. धीरज ससाणे, पै. नाना डोंगरे आदी उपस्थित होते.

देविदास साळवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये देशात फिट इंडिया हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमांतर्गत 623 जिल्ह्यातील नेहरु युवा केंद्रा मार्फत सायकल रॅली व धावणे स्पर्धा घेण्यात येत आहे. शरीर स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह युवक- युवतीमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. महेश शिंदे यांनी योगा, धावणे, सायकलिंग, पोहणे यांसह मैदानी खेळासाठी प्रत्येक युवक-युवतींनी दररोज वेळ दिला पाहिजे. व्यायामाने शाररीक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. तसेच योग्य आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगून, व्यसनापासून लांब राहून शरीर संपदा जपण्याचे त्यांनी आवाहन केले. अॅड.अनिता दिघे यांनी मुलींनी देखील मुलांप्रमाणे सर्व मैदानी खेळ खेळून दैनंदिन जीवनात व्यायाम केला पाहिजे. मुलींमध्ये आरोग्याचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून, व्यायामाचा अभाव व चुकीची आहार पध्दत हे मुख्य कारण आहे. तसेच मुलींनी संरक्षणाचे धडे घेऊन सक्षम तसेच मैदानी खेळ व व्यायामाने निरोगी आरोग्य जगण्याचा त्यांनी सल्ला दिला.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आले. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी या रॅलीच्या माध्यमातून सदृढ आरोग्याचा कानमंत्र दिला. तसेच प्रदुषण टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात सायकलचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थी सामुदायिक पध्दतीने धावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या अर्चना कुलकर्णी व रोहिणी काजळे यांनी केले. आभार अस्मिता खिलारी यांनी मानले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा