‘बाउन्सर’च्या संरक्षणात झाले इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

भिंगारमध्ये आयोजकांकडून किर्तनाच्या व्हिडिओ शुटिंगलाही घालण्यात आली बंदी

अहमदनगर – वादाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे नगर शहराजवळील भिंगार येथे कीर्तनासाठी शनिवारी (दि.15) दुपारी आले होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांच्या सुरक्षेसाठी आयोजकांच्यावतीने खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. बाउन्सरच्या कड्यामध्येच ते कीर्तनस्थळी आले. तसेच कीर्तन चालू असताना व्हिडिओ शूटिंगलाही बंदी करण्यात आली होती. वादाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

भिंगार येथे श्री शुक्लेश्वर मंदिरांमध्ये महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात शनिवारी (दि.15) दुपारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. महाराजांचे कीर्तन होणार का नाही, याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, इंदुरीकर महाराज दुपारी 12 च्या सुमारास भिंगारमध्ये आले. त्यांच्यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. गाडीतून उतरल्यानंतर ’बाउन्सर’ नी त्यांच्याभोवती कडे केले. त्या सुरक्षेतच त्यांना कीर्तनस्थळी आणण्यात आले. त्यानंतर सर्वात आधी कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी लावण्यात आलेले कॅमेरे काढण्यास सांगण्यात आले. जोपर्यंत हे कॅमेरे काढण्यात येणार नाही, तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही, अशी सूचनाही आयोजकांनी दिली. अखेर कॅमेरे काढल्यानंतर कीर्तन सुरू करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

तर कीर्तन सोडून शेती करेल

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी असा पुत्रप्राप्तीचा फॉर्म्युला सांगितल्या नंतर आरोग्य विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. यानंतर व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराज यांनी शुक्रवारी (दि.14) बीडच्या परळी तालुक्यात कीर्तन करत असताना आपल्या भावना बोलून दाखविल्या. कीर्तनामध्ये एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाही. मी बोललेलो अनेक ग्रंथात नमूद असल्याचे स्पष्ट केले. आपल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादामुळे व्यथित झालेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी याचा आपल्याला त्रास होत असल्याचे स्पष्ट करत एक-दोन दिवस बघेल आणि कीर्तन सोडून शेती करेल, असे म्हटले आहे.

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. असे विधान करून इंदुरीकर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांना नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर इंदुरीकर यांनी शुक्रवारी रात्री परळी (बीड) येथे झालेल्या कीर्तनामध्ये भाष्य केले. आपल्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादाचा हवाला देत त्यांनी आपल्याला याचा त्रास होत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ समर्थकांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.

हा तर सोशल मिडीयाचा गैरवापर

इंदुरीकर यांनी या संपूर्ण वादाचा ठपका युट्यूब चॅनल वर ठेवला आहे. ते म्हणाले, युट्युबवाले काड्या करतात. या यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र चॅनल संपतील पण मी संपणार नाही. युट्युब आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागून मला संपवायला निघालेत. मी कशातही सापडेना म्हणून मला गुंतविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आता तर मी या मुद्द्यावर आलोय, आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली. एखाद दुसरा दिवस जाऊ द्यायचा, फेटा ठेवून द्यायचा. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा