हेल्दी चिकू

चिकूच्या सेवनाने होणा-या फायद्यांवर आहारतज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले असून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जाते. चिकूचे झाड जास्तीत जास्त तीस मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. सर्वसाधारणपणे या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटरपर्यंत वाढते. उत्तम देखभाल लाभलेले चिकूचे झाड एका वर्षामध्ये दोन हजार फळे देऊ शकते.

चिकू हे फळ अवीट गोडीचे असून, भारत, मध्य अमेरिका, दक्षिण मेक्सिको, कॅरीबियन, वेस्ट इंडिज या भागांमध्ये प्रामुख्याने पाहिले जात असून, या ठिकाणी या फळाला ‘सॅपोटा’ या नावाने ओळखले जाते. काहीसा अंडाकृती असा या फळाचा आकार असून, याचा रंग पिवळसर भुरा असतो. उत्तम प्रतीचा चिकू वजनाला साधारण दीडशे ग्रॅमपर्यंत भरतो. चिकूला गोड चव देणारे सुक्रोज आणि ग्लुकोज शरीराला त्वरित ऊर्जा देणारे आहेत. तसेच या फळामध्ये असणा-या पोषक तत्त्वांमुळे याच्या सेवनाने त्वचा नितळ, चमकदार होते.

चिकूमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्त्वे असतात. यामध्ये ग्लुकोज, क्षार, जीवनसत्त्वे, लोह, तांबे असते. ही सर्व पोषक तत्त्वे शरीराचे एकंदर आरोग्य चांगले ठेवण्यास सहाय्यक आहेत. चिकूमध्ये क, ब, इ, जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आहेत, तसेच या फळामध्ये प्रथिनेही असल्याने हे फळ सर्वच पोषक तत्त्वांनी परिपूर्ण म्हणता येईल. चिकूमध्ये असलेले क्षार आणि जीवनसत्त्वे ‘स्ट्रेस’ कमी करणारी असल्याने ज्यांना मानसिक तणावामुळे निद्रानाश जडला असेल, अशांसाठी चिकूचे सेवन उत्तम असते. या फळामध्ये सर्वच पोषक तत्त्वे असल्याने गर्भवती महिलांच्या आहारामध्येही हे फळ अवश्य समाविष्ट केले जावे.

एखाद्या वेळी जर अचानक चक्कर येऊ लागली, किंवा मळमळू लागले, तर चिकू खाण्याने या समस्या नाहीशा होतात. चिकूमध्ये फायबर असल्याने बद्धकोष्ठ दूर करण्यासही याचे सेवन सहाय्यक आहे, तसेच चिकू रेचक असल्याने या फळाच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा