‘सोनेरी’ दिवस

सोन्याच्या भावात गेल्या दोन महिन्यात तोळ्यामागे चार हजार रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे विक्रेत्याबरोबरच ग्राहकही हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात 38 हजार 648 रुपये प्रति दहा ग्रॅमचा विक्रमी भाव गाठल्याने भविष्यातील किंमतीबाबत आडाखे बांधले जावू लागले आहेत. ही वाढ अशीच राहिली तर कदाचित सोन्याचा भाव हा 50 हजार रुपयांपर्यंत जाईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. सोन्याच्या भावात एक वर्षात सुमारे 30 टक्के वाढ नोंदली गेली आहे. गेल्या दोन महिन्यात चार हजाराने भाव वाढल्याने ग्राहक चक्रावून गेले आहेत. हीच स्थिती चांदी धातूची आहे. चांदीच्या भावाने 45 हजाराचा आकडा गाठला आहे. अर्थात सोन्याचे भाव वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. सध्याच्या काळातील जगभरातील अर्थव्यवस्थेत असलेली सुस्ती आणि अनेक देशातील मंदीच्या वातावरणामुळे शेअर आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घसरण झाली आहे. दुसरीकडे मुदत ठेवी, बचत योजनांचे व्याजदरही कमी होत चालले आहेत. त्यामुळे धातूला मागणी वाढत चालली आहे. यात भर म्हणजे अमेरिका-चीन व्यापार युद्ध, व्याजदरात कपात आणि अमेरिकेत तीस वर्षात बॉंड यिल्डने नीचांकी पातळी गाठल्याने डॉलरवरचा दबाव.

बहुतांश देश आपली गंगाजळी डॉलरमध्ये ठेवतात. सोन्याचा साठा वाढवून भविष्यात त्यास अधिक किंमतीने विकण्याचा सरकारचा प्रयत्न राहतो. त्यामुळेही सोन्याचे भाव वाढले आहेत. संपूर्ण जगातील बहुतांश देशाच्या सेंट्रल बँकेने 2019 च्या पहिल्या सहामीत 374 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत 68 टक्के अधिक आहे. यादरम्यान सोन्याच्या दरात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने तुर्कस्तान, कझाकिस्तान, चीन आणि रशियाच्या सेंट्रल बँक या सोन्यातील सर्वात मोठे खरेदीदार आहेत. तर रिझर्व्ह बँकेनेदेखील खरेदीत वाढ केली आहे. त्यामुळे आरबीआय खरेदीत टॉप टेनमध्ये सामील झाली आहे. यावर्षी सोन्याच्या एकूण मागणीतील केंद्रीय बँकांची खरेदी ही 16 टक्के राहिली आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आणि अमेरिकेचे पतधोरण यामुळे सोन्याच्या किंमतीत तेजीचे वातावरण दिसून येत आहे. मात्र त्यातही अनेक राजकीय आणि आर्थिक अडथळे दिसून येत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या स्थितीवर होऊ शकतो.

अमेरिकेत नोव्हेंबर 2020 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. सत्तेत बदल झाला तर आर्थिक धोरणात बदल होण्याची शक्यता आहे. यादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या साहित्यावरील कर आकारणी 1 सप्टेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्याचा परिणाम लगेचच बाजारावर झाला. जगभरात बाजारात तेजी आणि सोन्यात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ग्लोबल इकोनॉमिक ग्रोथ रेटचा अंदाजित दर हा 3.5 टक्क्यावरून 3.3 टक्के केला आहे. तर अमेरिकेत मंदीचे सावट असताना फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत सोन्याची मागणी आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी भारतात इटीएफ आणि अन्य माध्यमातून सोन्यातील गुंतवणूक ही फारशी वाढलेली नाही. कालांतराने गुंतवणुकीत वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमतीच्या तुलनेत भारतातील तेजी काही प्रमाणात मागे आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. भारतात खरेदीचा हंगाम हा सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईच्या मोसमात सुरु होतो. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीला बळ देणारा उत्सव अद्याप यायचा आहे. या काळात सोन्याची मागणी आणि भाव निश्‍चितच वाढेल, यात तिळमात्र शंका नाही. अर्थात या वातावरणामुळे सोन्याला येणारा भाव हा विक्रमी असणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा