रेशनकार्ड धारक व बिगर रेशनकार्ड धारक या सर्वांना शासनाने जीवन जगण्या पुरते अन्न धान्य उपलब्ध करून द्यावे

अहमदनगर  – रेशनकार्ड धारक व बिगर रेशनकार्ड धारक या सर्वांना शासनाने जीवन जगण्या पुरते अन्न धान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे. 

शासनाने १) अंत्योदय योजना २) प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना ३) १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शेतकऱ्यांसाठी धान्य योजना ४) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि ५) प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना मध्ये समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरविणे साठी योजना अशा ढोबळमानाने पाच योजना जाहीर केलेल्या आहेत.

शासनाच्या विचारानुसार देशातील गरजू सर्व कुटुंबे या योजनांच्या आधारे अन्नधान्यास पात्र ठरून सर्व कुटुंबांना अन्नधान्य मिळेल असा अंदाज आहे, मात्र प्रत्यक्षात असे घडत नाही. उदाहरणच घ्यायचे झाल्यास सर्वात गरजु असलेल्या अंत्योदय योजनेच्या रेशन कार्डमध्ये नावे समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्तींना सुद्धा धान्य दिले जात नाही.

विशेष म्हणजे समाजामध्ये रेशन कार्ड नसलेल्यांची संख्याही खूप मोठी आहे. या लोकांची सध्या फार मोठी गैरसोय होते आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही त्यामुळे पैसा येण्यासाठी कुठलाही मार्ग उपलब्ध नाही अशावेळी कुटुंब प्रमुख स्वतःच्या कुटुंबीयांना काय खाऊ घालायचे या विवंचनेत आहेत. शासनाने रेशन कार्ड नसलेल्या लोकांची यादी केली आहे मात्र सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतरही ह्या लोकांना शासनामार्फत अन्नधान्य मिळालेले नाही. यासाठी शासनाने रेशन कार्ड मधील सर्व व्यक्तींना तसेच ज्यांना रेशन कार्ड नाही अशा लोकांनाही अन्नधान्य पुरवावे अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, भारतीय जनसंसदचे युवा आघाडी प्रमुख अशोक ढगे, सरचिटणीस कैलास पठारे, डॉ. प्रशांत शिंदे, विर बहादुर प्रजापति, बबलु खोसला, भगवान जगताप, सुनील टाक, जसवंत सिंह परदेशी, अशोक डाके व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा