हिमोफिलीया म्हणजे काय?

आपल्याला कोठेही जखम झाली तरी रक्त येते. कालांतराने काही मिनिटांतच रक्त साकळते व वाहण्याचे थांबते. रक्त गोठण्याची ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. रक्त साकळले नाही, तर शरीरातील सर्व रक्त जखमेतून वाहून जाईल व मृत्यू ओढवेल. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यानंतर रक्तातील प्लेटलेट्स वा रक्तबिंबीका रक्त वाहत असलेल्या जागी गोळा होतात व तेथे जणू त्यांची एक गुठळी तयार होते. यानंतर रक्तातील प्रोथ्रोम्बीन, फायब्रिनोजेन सारखी प्रथिने, ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शियम आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणार्‍या इतर दहा घटक यांच्या एकत्रित प्रक्रियेमुळे जखमेनुसार 2 ते 13 मिनिटांत रक्तस्राव पूर्णपणे बंद होतो. यातील दहा घटकांना ‘एक’ ते ‘दहा’ अशा संख्येनेच ओळखले जाते.

हिमोफिलीया या रोगात रुग्णाच्या रक्तात रक्त साकळण्यासाठी आवश्यक असलेला घटक ‘आठ’ एक तर नसतो किंवा कमी प्रमाणात असतो. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये रक्त साकळत नाही वा उशीराने साकळते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये खूप रक्तस्राव होतो. घटक आठचा संपूर्ण अभाव असेल तर शरीरात कोठेही अचानक, आपोआप रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावू शकते. घटक आठ थोड्या प्रमाणात उपलब्ध असेल, तर आपोआप रक्तस्राव होत नाही. पण जखम झाल्यानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर खूप रक्तस्राव होतो.

हिमोफिलीया हा आनुवंशिक रोग आहे. लिंगसूत्रांशी निगडित असा रोग आहे. स्त्रियांना हा रोग होत नाही, मात्र त्या या रोगाच्या वाहक असतात. रोगवाहक स्त्रीशी निरोगी माणसाने लग्न केल्यास त्यांना होणार्‍या सर्व मुलांना हा रोग होतो. मुली मात्र रोगवाहक बनतात. या रोगावर उपचार म्हणजे रुग्णाला सामान्य, निरोगी व्यक्तीचे रक्त देणे. यामुळे रुग्णाचे आयुष्य नक्कीच वाढते. अर्थात घटक आठचा अभाव जर 20 टक्के वा त्याहून कमी असेल, तर रक्तस्रावाबाबत जागरूक राहून व योग्य ती काळजी घेऊन तो अगदी सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा