पारंपारिक वाद्यांच्या गजरातच निघणार गणेश विसर्जन मिरवणूक

डिजेला यावर्षीही पोलिस प्रशासनाची परवानगी नाही

अहमदनगर – गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (दि.12) रोजी होत असून नगरमध्ये मानाच्या 12 गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी डिजेला परवानगी नाकारली असल्याने पारंपरिक वाद्याच्या गजरातच ही मिरवणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराचे ग्रामदैत माळीवाडा येथील श्री विशाल गणेशाची उत्थापनपुजा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता होईल. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या विशाल गणेशापाठोपाठ महालक्ष्मी, कपिलेश्‍वर, दोस्ती, आदीनाथ, आनंद, नवरत्न, समझोता, निलकमल, शिवशंकर, माळीवाडा व नवजवान तरुण मंडळ अशा मानाच्या मंडळांचा समावेश असणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी गतवर्षी विसर्जन मिरवणुकीत डिजे वाजविण्यास बंदी केली होती. त्यामुळे गेल्या 25 वर्षात प्रथमच डिजेशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली होती. ढोल-ताशासह पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला होता. त्यावेळी डिजे परवानगी द्यावी अशी मागणी 9 गणेश मंडळांनी करत मिरवणुकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच या मंडळांनी प्रवरा संगम येथे जाऊन गणेश मुर्तींचे विसर्जन केले होते. यावर्षीही मंडळांच्या अध्यक्षांनी शहर विभागाचे पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन मिरवणुकीत डिजेला परवानगी देण्याची मागणी केली मात्र उपाधिक्षक मिटके यांनी ही मागणी अमान्य करत डिजे बंदी कायम राहिल असे स्पष्ट बजावलेले आहे.

डिजेबंदीचे उल्लंघन केल्याने मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच डिजेमालकांवरही गुन्हे दाखल होत असल्याने यावर्षी बहुतांश मंडळे डिजेऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरातच गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याच्या मानसिकतेत आहेत. तसे झाल्यास यावर्षी पुन्हा डिजेमुक्त विसर्जन मिरवणूक पार पडेल.

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील इमारतीची छते पोलिस ताब्यात घेणार

नगर शहरात दि. 12 सप्टेंबर रोजी श्री गणेश विजर्सन मिरवणूक काढण्यात येणार आहे. याप्रसंगी शांततेचा कोणताही भंग होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 39 अन्व्ये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पोलिस प्रशासनाकडून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील छते (गच्ची) ताब्यात घेण्यात येणार आहेत.

नगर शहरातील श्री गणेश विसर्जन मार्गावरील – कापड बाजार, बाबुशेठ बोरा, शहाजी चौक, नितू ड्रेस, शांतीलाल चोपडा, कापड बाजार, मोची गल्ली कॉर्नर, शाम देडगावकर, साफल्य इमारत, पाटेगल्ली कॉर्नर, डॉ. कुलकर्णी यांची इमारत, नवीपेठ मनपा दवाखाना, कन्हैय्यालाल चंगेडिया, नवीपेठ इचरजबाई फिरोदिया शाळेची इमारत, खामकर चौक, लोढा हाईटस, राम मंदिर, छाया टॉकिज, बडवे हॉस्पीमटल, डी चंद्रकात टेलर्स, संतोष गुगळे याची इमारत, रंगारगल्लीकडे जाणारे रोड, डॉ. सुंदर गोरे हॉस्पीटल, चौपाटी कारंजा, दिपाली एक्झीबिटर बिल्डींग, बेलदार गल्ली कॉर्नर, सुरतवाला बिल्डींग, तेलीखुंट, संतोष गुगळे यांची इमारत खामकर चौक, सुनहरी मस्जिद अल्पना बेकरीचे वर चितळे रोड, उल्हास टेलर्स राजू ढोरे यांची इमारत नेता सुभाष चौक, देशबंधु हॉटेल श्रीमती गोंगे यांची इमारत चितळे रोड, दिपक ऑईल डेपो दिपक परदेशी, गणेश अष्टेकर, कागद कुट्टा मस्जिद ट्रस्टी शेख चॉंद भाई, पटेल मेडिक, तांबे मेडिकल सुभाष पाठक, दत्त मदिर ट्रस्ट श्री गोरेगावकर यांची इमारत चौपाटी कारंजा, दिल्लीगेट वेस या इमारतींचे छते (गच्ची) गुरुवारी (दि. 12) सकाळी 8 वाजेपासून (दि. 13) सकाळी 8 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेण्यात येणार आहेत असे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सांगितले आहे.

27 रस्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

गणपती विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गाला येऊन मिळणार्‍या डाव्या व उजव्या बाजूच्या मिळून एकुण 27 रस्त्यांवर नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

नगरमध्ये गणेश विसर्जनाची रामचंद्र खुंट येथून मिरवणूक सुरू होते व नेप्ती नाक्याजवळ असणार्‍या बाळाजी बुवा विहिरीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता होते. गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडावी, मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विसर्जन मिरवणूक मार्गाला डाव्या बाजूने येऊन मिळणार्‍या 15 व उजव्या बाजूने येऊन मिळणार्‍या 12 रस्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार मिरवणूक सुरू असताना मिरवणूक मार्गाला येऊन मिळणार्‍या या 27 रस्त्यांचा मिरवणूक मार्गापासून शंभर मीटर अंतरापर्यंत वापर करण्यास प्रतिबंध असणार आहे.

दरम्यान, रामचंद्र खुंट येथून गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होणार असून तेथून आडतेबाजार, दाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक रोड, नवी पेठ, खामकर चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट मार्गे नेप्ती नाक्याजवळील बाळाजी बुवा विहिरीजवळ मिरवणूक येणार असून या विहिरीमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

गणेश विसर्जनासाठी 5 ठिकाणी व्यवस्था

गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होत आहे. यानिमित्ताने महापालिकेने गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग अतिक्रमण मुक्त करुन शहरात 5 ठिकाणी सात हौर व दोन विहिरींची मुर्ती विसर्जनासाठी सोय केली आहे. अमरधाम जवळील बाळाजीबुवा विहिर स्वच्छ केली असून त्यात नवीन पाणी सोडण्यात आले आहे. या विहिरीत मंडळांचे व मोठे गणपती विसर्जन करता येतील. तर या विहिरीजवळच दोन कृत्रिम हौद तयार करण्यात आले असून त्यात छोटे व घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात येईल. याशिवाय बोल्हेगावमधील सिनानदीपुलाजवळ एक, केडगावमध्ये मधुरमिलन मंगल कार्यालयाजवळ दोन आणि बुरुडगाव रस्त्यावरील साईनगरमध्ये एक कृत्रिम हौद तसेच सावेडी उपनगरातील विसर्जनासाठी यशोदानगरमधील विहिरीत गणेश मुर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या पाचही ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात आले असून निर्माल्य कलशही ठेवण्यात आला आहे. याठिकाणी प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली असून प्रत्येक हौर व विहिरीजवळ महापालिकेचे प्रत्येकी 10 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

विशाल गणपती ट्रस्टची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या हस्ते उत्थान पूजा

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून, त्यानिमित्ताने गुरुवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. राहुल द्विवेदी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या हस्ते ‘श्रीं’ च्या मुर्तीची उत्थापन पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रथम मानाच्या गणपतीचा विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.

या मिरवणुकीत अग्रभागी नगार्‍याची बैलगाडी, सावता माळी महिला मंडळाचा दांडिया, रिद्म ढोल पथक, बुर्‍हाणनगर येथील शिवकृपा कडे पथक, हलगी पथक, लेझिम पथक, झांज पथक आदि सहभागी राहणार आहेत. तसेच सकाळी 11 वा. रामचंद्र खुंट येथून विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मिरवणुकीस मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.

ही विसर्जन मिरवणुक माळीवाडा येथून सकाळी 9.30 वा. निघून, 10 वा.रामचंद्र खुंट, 11 वा. दाळमंडई, 11.30 वा. तेलीखुंट चौक, 12 वा. घासगल्ली चौक, 12.45 वा. भिंगारवाला चौक, 1.30 वा. अर्बन बँक चौक, 2.15 नवीपेठ कॉर्नर, 3 वा. विशाल इलेक्ट्रॉनिक्स, नवीपेठ, 3.30 वा. नेता सुभाष चौक, 4 वा. जिल्हा वाचनालय, 4.30 वा. चितळेरोड पोलिस चौकी, 5 वा. चौपाटी कारंजा दत्त मंदिर, 5.30 वा. शमी गणपती, 6 वा. दिल्लीगेट वेशीबाहेर जाईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी दिली.

मिरवणुक यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, सहसचिव रामकृष्ण राऊत, उत्सव समितीप्रमुख बाबासाहेब सुडके, खजिनदार पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, हरिश्‍चंद्र गिरमे, भाऊसाहेब फुलसौंदर, चंद्रक़ांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, ज्ञानेश्‍वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, शिवाजी शिंदे, प्रकाश बोरुडे, महंत योगी संगमनाथ महाराज प्रयत्नशील आहेत.

मिरवणूक मार्गावर रांगोळी पायघड्या उपक्रम

येथील रंगसंस्कृती ग्रुपच्यावतीने विशाल गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रांगोळी पायघड्या उपक्रमाचे 12 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या 7 वर्षांपासुन रंगसंस्कृती हा रांगोळी कलाकारांचा ग्रुप नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर आकर्षक नयनरम्य रांगोळी पायघड्या व प्रत्येक चौकात मोठ्या रांगोळ्या काढतात. यावर्षी देखील हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे रंगसंस्कृती ग्रुपचे रांगोळी कलाकार दिनेश मंजरतकर व विजय आहेर यांनी सांगितले. या उपक्रमासाठी साधारणत: 1200 ते 1400 किलो रांगोळी व विविध कलर्सची रांगोळी वापरण्यात येते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा