कारागृहाला कारागृह न म्हणता चिंतनगृह म्हणावे – ह.भ.प. अमित महाराज धाडगे

अहमदनगर- आषाढी एकादशीला सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असतांना कारागृहातील बंदीबांधवांना या आषाढीचा लाभ मिळावा, विठ्ठलाची भेट व्हावी. याकरीता भिंगार येथील ह.भ.प. अमित महाराज धाडगे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह आज कारागृहात कीर्तनाचा गजर करून करागृहातील बंदी बांधवांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी कारागृह अधिक्षक नागनाथ सावंत, सिनीअर जेलर शामकांत शेडगे, जेलर श्रीमती देवका बेडवाल, श्रीमती सुवर्णा शिंदे, सुभेदार दशरथ जवणे, कर्मचारी तसेच हभप अमित महाराज धाडगे यांना अविनाश अकोलकर (मृदंग), कैलास कोहक, संभाजी बांदल, अप्पासाहेब बावचे, आकाश सरोदे, अनिल बर्डे, गुरुदत्त शिंदे, जगन्नाथ कोहक, अॅड.रोहित बलदोटा आदींनी साथसंगत केली.

कीर्तनामध्ये धाडगे महाराज म्हणाले, खर्‍या अर्थाने ज्ञानोबा, तुकोबांच्या विचारांचा गजर जर या समाजात कोठे असेल तर तो या कारागृहांमध्ये आहे. त्यामुळे तुरुंग हा चिंतागृह न होता चिंतनगृह होईल त्या दिवशी लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरु व विवेकानंद जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. कारागृहात आल्यानंतर सगळेच बंदी चिंता करतात. परंतु ही चिंता तुम्हाला नाही तर तुमच्या बाहेर असणार्‍या नातेवाईकांना जास्त असते. ‘जग हे बंदी शाळा’ असून, तुम्ही या चार भिंतीच्या आत आहात तर आम्ही सुद्धा या जगात बंदी आहोत, हे जगच एक बंदीशाळा आहे.

धाडगे महाराज पुढे म्हणाले, संत श्री ज्ञानेश्‍वर महाराजांनी कोणत्याही एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी सुख मागितले नाही तर समस्त मानवजातीसाठी सुख त्या विश्‍वात्म्याकडे मागितले. ‘आता विश्‍वात्मके देवे…’ तसेच दृष्टांत सांगतांना म्हणाले, ‘मंदिर पे भी गिरता है, मस्ज़िद पे भी बरसता है, ये बारीश आज बताही दे तेरा मजहब कौनसा है। मजार कि तू शाल बनाता है, मुरत को भी तू सजाता है, ये फूल आज बताही दे तेरा मजहब कौनसा है। अरे अल्ला भी तू है और राम भी तू है, आज बताही दे तेरा मजहब कौनसा है।’

मेल्यानंतर प्रेताची विल्हेवाट कशी लावायची हे धर्म शिकवितो परंतु माणूस जन्माला येताना आईच्या पोटात 9 महिने 9 दिवस काढावे लागतात. ही पद्धत कोणीच बदलली नाही. भगवंताने आपल्याला जन्माला घालताना फरक केला नाही मग जगतांना आपण आपल्यामध्ये जाती, धर्माचा फरक का केला? संतांच्या संगतीमध्ये आपण आलो ना तर आपल्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही. तसेच आपल्या माणसाची वाट पाहणे काय असते हे बंदी बांधवानो तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारा. ते एक-एक क्षण मरत असतात. तो जन्म देणारा बापू तुम्हाला या कारागृहाच्या बाहेर काढतांना पैसेवाल्यांच्या पाया पडतात ना ती वेळ आठवा, ती आई तुमच्या वाचून एक-एक क्षण रडत असते ना ती वेळ आठवा, ती पत्नी व मुलं तुमच्याशिवाय कशी घुटमळत जगातात ना ती वेळ आठवा’, अशी भावनीक साद घालून श्री.धाडगे महाराजांनी बंदी बांधवांच्या डोळ्यात आश्रू आणले. कारागृहात आज झालेल्या या कीर्तनामुळे बंदी बांधवांच्या भावनांचा बांध फुटला व त्यांनी पुन्हा गुन्ह्याच्या वाटेला न जाण्याची शपथ घेतली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा