नगरमधून भाजपचे डॉ. सुजय विखे तर शिर्डीतून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी

अहमदनगर- नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा महायुतीने सन 2014 च्या निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करत गड राखला आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पुन्हा पराभवाचा धक्का बसला आहे. नगरमधून भाजपाचे डॉ.सुजय विखे तर शिर्डीमधून शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदार संघांची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून नगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच नगर मधून डॉ. विखे तर शिर्डीत खा. लोखंडे यांनी आघाडी घेतली होती. ती प्रत्येक फेरीत कायम राहिली. नगर मतदारसंघात मतमोजणीच्या 24 तर शिर्डी मतदारसांत 21 फेर्‍या झाल्या. त्यातील 11 लाख 78 हजार 785 मतांची मोजणी सायंकाळ पर्यंत झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांना 6 लाख 88 हजार 984 मते तर आ. संग्राम जगताप यांना 4 लाख 15 हजार 256 मते मिळाली होती. डॉ. विखे यांना सुमारे 2 लाख 73 हजार 728 मतांची निर्णायक आघाडी मिळाली होती. तर शिर्डीत खा. सदाशिव लोखंडे यांना 4 लाख 83 हजार 449 मते व आ. भाऊसाहेब कांबळे यांना 3 लाख 64 हजार 113 मते मिळाली होती. खा. लोखंडे यांनीही सुमारे 1 लाख 19 हजार 336 मतांची निर्णायक आघाडी घेतली होती.

नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीपासूनच राज्य भर चर्चेत राहिली. काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुजय विखे यांना तिकीट सोडण्याची राष्ट्रवादीकडे मागणी केली होती. राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शाब्दिक चकमकही उडाली होती. त्यानंतर सुजय यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी डावलून डॉ. सुजय यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने तरुण चेहरा म्हणून आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली.

आमदार जगताप यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने त्यांची चांगलीच धावपळ झाली. अवघ्या 22 दिवसात त्यांनी प्रचार यंत्रणा राबविली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक चुरशीची झाली असल्याचे दिसून येत होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीच्यावेळी ही चुरस दिसून आली नाही. प्रत्येक फेरीत डॉ.सुजय विखे हेच आघाडीवर राहिले. त्यामुळेच आ.संग्राम जगताप यांचा सुमारे 2 लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव झाला.

नगर दक्षिणेत विखेंची यंत्रणा जशी डॉ.सुजय विखेंसाठी कार्यरत राहिली त्याच पद्धतीने शिर्डीमध्येही शिवसेनेचे उमेदवार खा.लोखंडे यांच्यासाठी विखेंनी ताकत लावली. त्यामुळे खा.लोखंडे यांचाही विजय सुकर झाला.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप हे पिछाडीवर राहिले. शिर्डी मतदार संघातही शिवसेनेचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली मात्र ही आघाडी सुरुवातील कमी मतांची आघाडी राहिली मात्र जसजशी मतमोजणी पुढे गेल तसे लोखंडे यांचे मताधिक्क्य वाढत राहिले आणि काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे मोठ्या फरकाने पिछाडीवर राहिले.

जिल्ह्यात विखेंनी दाखवून दिली ताकद

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर राधाकृष्ण विखे यांचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. नगर दक्षिणमध्ये विखेंनी मुलगा डॉ.सुजय यांच्या पाठिशी संपूर्ण पाठबळ उभे करतानाच शिवसेनेचे शिर्डीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांना ताकद देत काँग्रेसमध्ये राहून युतीधर्माचे पालन केले हे विशेषच आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांना आघाडीवर आणत राधाकृष्ण विखे यांनी भाजपची ताकद दाखवून दिली आहे.

विखेंना मिळणार मंत्रिमंडळात स्थान

जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांबाबत मोलाची कामगिरी करत राधाकृष्ण विखेंनी भाजपच्या नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी यांची संगमनेर येथे जाहीर प्रचार सभा होऊनही विखेंच्या रणनितीमुळे काँग्रेस उमेदवारास या सभेचा काहीही फायदा झाला नसल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. भाजप नेतृत्वाबरोबरच नगरच्या जागेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करणार्‍या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांना विखेंनी चांगलाच शह दिला आहे. या सर्व गोष्टींचे फलित म्हणून विखेंना युतीच्या राज्यातील सरकारमध्ये मानाचे पान मिळणारच अशी चर्चा सुरु झाली आहे. विखे लवकरच भाजपात प्रवेशाचा निर्णय घेणार असून त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राधाकृष्ण विखेंना राज्यात तर उच्चशिक्षित असलेल्या डॉ. सुजय विखेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशीही चर्चा सुरु आहे. तसे झाल्यास विखे घराण्यात पिता-पुत्रांना एकाचवेळी मंत्रिपदे मळण्याची घटना दुसर्‍यांदा घडेल.

जिल्ह्यातील काँग्रेसची अत्यंत दयनिय अवस्था

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात काँग्रेसची सध्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.

बाळासाहेब थोरात यांचा अपवाद सोडल्यास या पक्षाला आता कोणीही वाली राहिलेला नाही. राधाकृष्ण विखे यांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे तर या पक्षाला आता पणवती लागली आहे. थोरात यांचा संगमनेर तालुका वगळता जिल्ह्याच्या इतर भागात काँग्रेस पक्ष औषधालाही शिल्लक राहिलेला दिसत नाही. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जनतेचा नव्हे तर नेते आणि कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित झाल्याचे स्पष्ट आहे.

मुख्यमंत्र्यांशी पैज लावलीय – सुजय विखे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये पैज लागलीय. राज्यात मी पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईल, असं त्यांना सांगितलंय. आताचे कल पाहता राज्यातील पहिल्या तीन सर्वाधिक मताधिक्य असलेल्या उमेदवारांमध्ये मी असेन,’ असा विेशास अहमदनगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज व्यक्त केला.

सुजय यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ’राज्यात युतीच्या 42 जागा येतील, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना 38 जागांचा आकडा सांगितला होता. आताचा कल पाहता मुख्यमंत्र्यांचा अंदाज खरा ठरतोय, असं दिसतंय,’ असं सुजय म्हणाले.

’हा विजय मी माझे आजोबा बाळासाहेब विखे यांना अर्पण करतो. मला पडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. काहीजण मतभेद विसरून माझ्या विरोधात एक झाले. पण नगर जिल्ह्यातील जनतेने द्वेषाच्या राजकारणाला उत्तर दिलंय. नगरमध्ये विखे-पाटील ही काय ताकद आहे, हे आम्ही दाखवून दिलंय. ’प्रवरा पॅटर्न’चा पुन्हा उदय झालाय. देशात सगळीकडं भाजपचं वातावरण आहे, तसं ते नगर जिल्ह्यातही आहे. परंतु सर्वाधिक मताधिक्यातून इथं विखेंची ताकद दिसली आहे,’ असं सुजय म्हणाले.

’हा विजय सुजय विखे यांचा नसून जिल्ह्यातील युवक, माता-भगिनी व युतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. निवडणूक काळात दिलेली सर्व ओशासनं शंभर टक्के पूर्ण करणार. विकासाचा शब्द पूर्ण करणार,’ अशी ग्वाही सुजय यांनी दिली.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा