भिंगारला मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणूक

अहमदनगर – येथील श्रींची सार्वजनिक विसर्जन मिरवणुक परंपरेनुसार द्वादशीच्या दिवशी मंगळवारी (दि.10) होणार आहे. मिरवणुकीस दुपारी 12 वाजता प्रारंभ होईल अशी माहिती मानाच्या देशमुख गणपतीचे प्रमुख समीर देशमुख यांनी दिली.

ब्राह्मण गल्लीतील देशमुख गणपती मंदिरात मंगळवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची उत्थापन पूजा होईल. त्यानंतर मिरवणूक निघेल.

गणपतीच्या उत्थापन पुजेसाठी भिंगारमधील सर्वपक्षिय पदाधिकारी बँका, पतसंस्थेचे संचालक, मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

मानाचा गणपती व सार्वजनिक मिरवणुकीचे यंदा 97 वे वर्ष असून आता शताब्दीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत असे ते म्हणाले.

मागील काही वर्षांपासून मानाच्या गणपतीची पालखीत मिरवणूक निघते. ही पालखी खळेवाडीतील सुरेश बेरड या कारागीराने बनवली आहे. ती दरवर्षी फुलांनी सजवण्याचे काम शब्बीर सय्यद, अन्सार सय्यद हे करतात. तर मिरवणुकीत सनई चौघडा वाद्य वाजविण्याचे जबाबदारी गयाजभाई शेख या मुस्लिम बांधवांनी घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सेवाभावी वृत्तीने हे कार्य स्विकारले आहे. आपण देवू तेवढे मानधन ते घेतात असे देशमुख यांनी सांगितले.

यावर्षी पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर पाककृती, रांगोळी, चित्रकला, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या असे देशमुख यांनी सांगितले.

नगरला मोहरम व भिंगारला गणपती विसर्जन मिरवणूका एकाच दिवशी आल्याने कॅम्प पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मागीलवर्षी देखील असाच योग आला होता. मानाच्या देशमुख गणपती मुस्लिम बांधवांचे महत्त्वपूर्ण योगदान असते तर गवळीवाड्यात सवारी हिंदु बसवितात. देखभाल त्यांच्याकडेच असते. विसर्जन देखील तेच करतात येथे खर्‍या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा