भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे

भगवंताचे नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि ‘तुला काय पाहिजे’, असे त्याने विचारले, तर ‘तुझे नामच मला दे’, हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता. रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल; पण त्याचे नाममात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की, त्याला इकडे (नामाकडे) यावेच लागेल.

भगवंताच्या रूपाला बंधने आहेत, तर भगवंताचे नाम हे बंधनातीत आहे.

भगवंताचे रूप हे जड (स्थूल) आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती-स्थिती- लय, स्थळ इत्यादी बंधने त्याला असतात; पण नाम हे दृश्याच्या पलीकडचे, म्हणजे सूक्ष्म असल्याने त्याला देशकालमर्यादा इत्यादी विकार नाहीत; म्हणून नाम आज आहे आणि पुढेही तसेच राहील; कारण ते सत् स्वरूप आहे.

रामापेक्षा रामनाम महत्त्वाचे, तसे स्वत:पेक्षा स्वत:ची स्वाक्षरी (लिखित नाव) महत्त्वाची!

श्री रामचंद्राचे नाम घेऊन वानरांनी समुद्रात दगड फेकून सेतू बांधला. नामामुळे समुद्रात दगड तरंगू शकले; पण स्वत: रामचंद्रांनी दगड फेकला तेव्हा तो बुडाला. म्हणूनच म्हणतात, ‘रामसे बडा रामका नाम।’ आजकाळच्या काळीही अक्षरांचा अनुभव येतो. बँकेत १ कोटी रुपये असणारा लक्ष्मीपुत्र बँकेत जाऊन १०० रुपये मागू लागला, तर त्याला ते मिळत नाहीत; परंतु त्याने स्वत:ची स्वाक्षरी करून, म्हणजे नाव लिहून कागद, म्हणजे धनादेश दिला, तर त्याला पैसे मिळतात.