‘जागतिक आरोग्य दिन’चे औचित्य साधत ; “कॉमा” माहितीपट ऑनलाईन प्रकाशित

नगरच्या आशिष निनगुरकर याचे दिग्दर्शन; ‘आपले आरोग्य,आपल्या हाती’चा अनमोल संदेश

अहमदनगर –  जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत कर्करोगाशी संबंधित असणारा नगरच्या आशिष निनगुरकर दिग्दर्शित  ‘कॉमा’ हा माहितीपट रसिकांसाठी आता युट्युब चॅनेलवर ऑनलाईन प्रकाशित करण्यात आला आहे.जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी असतो. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नव्हे तर मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक ,आर्थिक असं ते विविधांगी असतं. आपल्याला तसं ते जीवनभर लाभलं पाहिजेच.सध्या ‘कोरोना’ विषाणूमुळे ओढवलेल्या जागतिक भीषण परिस्थितीत ‘आपलं आरोग्य’ उत्तम राहावे तसेच कर्करोगावर आधारित असणारा व आरोग्यासंबंधी अनमोल संदेश देणारा ‘कॉमा’ हा माहितीपट ‘एन.एम.टी.व्ही इंडिया’ या अधिकृत वेबपोर्टलच्या सहाय्याने ‘जागतिक आरोग्य दिनी’ ऑनलाईन प्रकाशित करण्यात आला आहे,अशी माहिती या माहितीपटाचे सहनिर्माते देवेंद्र भुजबळ यांनी दिली.

काव्या ड्रीम मुव्हीज व सौ.किरण निनगुरकर यांनी या माहितीपटाची निर्मिती केली असून नगरचे हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.देवेंद्र भुजबळ हे या माहितीपटाचे सहनिर्माते आहेत.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन येथे ‘कॉमा’ हा माहितीपट २९ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झाला होता.राज्यपाल महोदय हा १० मिनिटे कालावधीचा लघुपट पाहून खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी यासंबंधी उत्तम मार्गदर्शन केले होते.तेव्हापासून या माहितीपटाची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

एकतर कॅन्सर होणं, लगेच तो दुसऱ्या टप्प्यात जाणं,उपचार सुरु करणं, मग अचानक त्याचं निदान होणं, हे सर्व खूपच धक्कादायक होतं. सौ.अलका भुजबळ यांच्यावर जीवनावर आधारित असणाऱ्या या माहितीपटातून कॅन्सर बद्दलच्या अनेक गोष्टी विस्तृत मांडण्यात आल्या आहेत.त्या स्वतः कशा या रोगातून पूर्णपणे बऱ्या झाल्या, हे सर्व या माहितीपटातून कळते.हा प्रवास निच्छितच सोपा नव्हता.त्यांना झालेला त्रास,त्यावर त्यांनी केलेली मात हा अनुभव ऐकण्यासारखा व बघण्यासारखा आहे.त्यांचे पती देवेंद्र भुजबळ व मुलगी देवश्री यांनी कशाप्रकारे खूप धीराने ही परिस्थिती हाताळली तसेच त्यांच्या कर्करोग लढ्यात डॉ. रेखा डावर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी कशा उभ्या होत्या.हे सगळं नमूद करून आपण कॅन्सर झाल्यावर कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी, हे या माहितीपटातून उत्तमरीत्या दाखविण्यात आले आहे.

आपलं आरोग्य अमूल्य आहे. त्यामुळे ते बिघडणार नाही म्हणून,आपण आपली दिनचर्या, स्वच्छता,सकस आहार, व्यायाम, ध्यानधारणा करण्याचं, निदान पस्तिशीनंतर आपले डॉक्टर सांगतील त्या तपासण्या करणं आवश्यक आहे. सुखी, दीर्घ आयुष्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. असा अनमोल कानमंत्र या माहितीपटातून मिळतो. आता सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कधी न मिळणारा वेळ आपणास मिळत आहे.त्यामुळे एरव्ही असणारी आपली ‘वेळ मिळत नाही’,ही सबब आता नाहीये.तरी या परिस्थितीचा आपण आपल्या  आरोग्यदायी जीवनासाठी उपयोग करून घेऊ शकतो. हा  माहितीपट  ‘एन.एम.टी.व्ही इंडिया’ या अधिकृत वेबपोर्टलच्या सहाय्याने ‘जागतिक आरोग्य दिनी’ ऑनलाईन प्रकाशित झाला असून आपण तो   https://www.youtube.com/watch?v=8Gz3yNnR4ic&t=1s   या वेबसाईट वर पाहू शकता. सिद्धेश दळवी यांनी “कॉमा” या माहितीपटाची छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून अभिषेक लगस यांनी संकलन केले आहे. या माहितीपटासाठी काव्या ड्रीम मुव्हीजची संपूर्ण टीम तसेच प्रदीप कडू,अशोक कुंदप,आशा कुंदप, प्रतिश सोनवणे,चंद्रकांत कुटे,स्वप्नील निंबाळकर व सुनील जाधव यांनी अनमोल सहकार्य केले आहे. आरोग्य दिनाचे औचित्य साधत ‘आपल्या आरोग्याची काळजी,आपण घेऊया’ अशी शपथ घेण्याचे आवाहन या टीमकडून करण्यात येत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा