‘कोरोना’ विरुध्दच्या लढाईत आरोग्य रक्षकांना ‘अहमदनगर फर्स्ट’ ग्रुपतर्फे ७५ लाखांची साहित्याची मदत

परराज्यासह परदेशातूनही दर्जेदार साहित्य नगरमध्ये आणण्याचे काम

अहमदनगर – ‘कोरोना’ विरुध्दच्या लढाईत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी बजावत असलेली भूमिका अक्षरश: देवदूतासारखीच आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे आरोग्य रक्षक कोरोनाशी दोन हात करीत रूग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मानवतेच्या या रक्षणकर्त्यांना या लढाईत दर्जेदार आरोग्य रक्षक साधनांची कमतरता भासत आहे. ही बाब ओळखून नगरमधील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांनी ‘अहमदनगर फर्स्ट’ कोविड १९ नगर प्लॅटफॉर्म या ग्रुपची स्थापना केली. ग्रुपने जिल्हा प्रशासन व नगरमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून तब्बल ७५ लाखांची आरोग्य रक्षक साहित्याची मदत केली आहे. यात पीपीई किटस, एन ९५ मास्क, हॅण्डग्लोवज, थ्री लेयर मास्क, सॅनिटायजर ड्रम व बॉटल, फेस शिल्ड, गन थर्मोमीटर अशा साहित्याचा समावेश आहे.

सध्या देशभरातच या साहित्याची कमतरता असल्याने सदस्यांनी परराज्यातुन तसेच थेट परदेशातुनही संरक्षक सामग्री मागवली. नगरमध्ये हे आरोग्य रक्षक साहित्य जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा रुग्णालय तसेच कोरोनाशी निगडीत उपचार करणार्या हॉस्पिटलमध्ये पोहोच केल्या जात आहेत. शनिवारी ही आरोग्य संरक्षक मदत अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे डॉ. बापूसाहेब गाडे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ विद्याधर पवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी अनुराग धूत, सतिश बोथरा, कुशल मुनोत, आदेश चंगेडिया, कमलेश भिंगारवाला, गिरीश अग्रवाल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, डॉ. एस.एस.दीपक, डॉ. अभिजीत पाठक, सी.ए.रमेश फिरोदिया हेही मार्गदर्शक म्हणून यात सहभागी झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करतानाच आरोग्य रक्षक बनलेल्या डॉक्टर, नर्स तसेच अन्य आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडण्यात आला. सध्या देशभरातच डॉक्टर, नर्स आदींना दर्जेदार संरक्षक साहित्याचा तुटवडा भासत आहे. ही बाब ओळखून नगरमध्ये कोरोनाशी दोन हात करणार्‍या आरोग्य रक्षकांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण आरोग्य रक्षक साहित्य देण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यादृष्टीने आवश्यक निधी संकलन करण्यात आले. सध्या पीपीई किटस तसेच अन्य आवश्यक रक्षक साहित्याची  उपलब्धता कुठे आहे याचा शोध घेवून थेट परराज्यातुन तसेच परदेशातुनही हे साहित्य खरेदी करून ते नगरमध्ये आणण्यात आले.

या उपक्रमासाठी इपिटोम कॉम्पोनंटस प्रा.लि.चे अनुराग धूत व श्रीरामकृष्ण परिवाराचे श्रीगोपाल धूत यांनी १० लाख रुपये, क्रॉम्प्टन कंपनीने सीएसआरमधून १० लाख रुपये, पारस ग्रुप (बोथरा परिवार), किरण कर्नावट नरेंद्र फिरोदिया ग्रुपने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे योगदान दिले. याशिवाय अन्य उद्योजक, व्यावसायिक यांनीही देणगी दिल्या. सदर निधी रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टमध्ये एकत्र करण्यात येत आहे. या मदत कार्यात योगदान देण्यासाठी किमान २१ हजारांची देणगी अपेक्षित असून अशा देणगीदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रुपने केले आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळात गरजूंना किराणा साहित्यही पोहोच केले जात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा