दुष्काळाचा सामना करतानाच विकासकामांना गती – पालकमंत्री प्रा.राम शिंदे 

अहमदनगर- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते, जलसंधारण, कृषी, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देत जिल्हा विकासाच्या कामांना गती देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 72 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखेपाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे आणि तात्काळ निर्णय घेतले. दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील 6 लाख 79 हजार 436 शेतकर्‍याऩा 373 कोटीहून अधिक अनुदानाचे वितरण केले. आवश्यक तेथे मागणीनुसार चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. रोजगार हमी योजनेत 34 हजार 254 कामांचे शेल्फही तयार केले. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एकूण 96 गावांसाठी 80 कोटी, जलस्वराज्यमधून 45 कोटी निधी देण्यात आला. मागील 4 वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी 44 कोटी 89 लाख रुपये निधी देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण 746 गावांसाठी 268 योजनांसाठी 667 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 3 लाख 5 हजार 700 शेतकर्‍यांना 1 हजार 27 कोटी 67 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 2 लाख 20 हजाराहून अधिक शेतकर्‍यांना 121 कोटी 29 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याचे ते म्हणाले.

जलयुक्त शिवार अभियानात मागील 4 वर्षात 1 हजार 35 गावांत 38 हजार 34 एवढ्या कामांतून 2 लाख 25 हजार 597 टीसीएम पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता तयार झाली तर 4 लाख 51 हजार 196 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले. जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील पाच तालुक्यात जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे होत आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत गेल्या 4 वर्षात 272 तलावातील 2 कोटी 76 लाख 5 हजार 903 घनमीटर गाळ काढण्यात आला. यामुळे 2 हजार 765 घनमीटर पाणीसाठा निर्माण झाल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ, उदय किसवे, महेश पाटील, शाहूराज मोरे, जितेंद्र पाटील, जयश्री माळी, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटील, सुधीर पाटील, किरण सावंत-पाटील, हेमा बडे आदींची उपस्थिती होती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा