आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

आम्ल (आंबट), लवण (खारट) या रसांचे पदार्थ जास्त प्रमाणात खावेत. बाजरीची भाकरी, पोळी, भात, दूध, दही, लोणी, तूप, दुधाची साय या सर्व पदार्थांचा आहारामध्ये समावेश असावा. बाजरीची भाकरी रूक्ष असल्यामुळे तूप लावून खावी. बदाम, काजू, अक्रोड, अंजीर, शेंगदाणे, खारीक, खोबरे, खजूर, काळे मनुके, जर्दाळू असे ड्रायफ्रुट्स खावेत. रात्री झोपताना बदाम, खारीक, काळे मनुके, अक्रोड, शेंगदाणे दुधामध्ये भिजत घालून पहाटे लवकर उठून हे ड्रायफ्रुट्स खावेत. कारण या ऋतूमध्ये रात्र मोठी व दिवस लहान असतो, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. यावेळी जर ड्रायफ्रुट्स खाल्ले, तर रिकामे पोट असल्यामुळे त्याचे पचन व्यवस्थित होऊन शरीराचे पोषण व्यवस्थित होते. सर्व पालेभाज्या, कडधान्ये, फळभाज्या भरपूर खाव्यात. फळांमध्ये ऋतुनुसार असणारी फळे खावीत.

उदाहरणार्थ केळी, चिकू, सफरचंद, पेरू, संत्री, मोसंबी, द्राक्षे, कवठ. यातील जी फळे उपलब्ध असतील ती खावीत. मसाल्याचे व तळलेले चमचमीत पदार्थ योग्य प्रमाणात या ऋतूमध्ये खाऊ शकतो. मांसाहार करणार्‍यांनी मासे, चिकन, मटण, अंडी खाण्यास हरकत नाही. सर्वप्रकारची मिठाई या ऋतूत खाऊ शकतो, परंतु बाहेरील भेसळीचे प्रमाण व साखरेचा अतिवापर या गोष्टींमुळे सहसा घरी बनविलेली मिठाई खावी. कारण दूध, खवा यामध्ये भेसळ करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा पदार्थांपासून बनलेली मिठाई खाल्ली, तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. पाणी उकळून, गाळून प्यावे. सहसा या ऋतूत पिण्याचे पाणी कोमट करून किंवा हंड्यामधील प्यावे. अति थंड पाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे अति थंड शीतपेये, आईस्क्रीम खाऊ नये. कारण त्यामुळे कफसंचय होऊन सर्दीखोकला, दमा असे आजार होऊ शकतात.

विहार : या ऋतूत सकाळी लवकर उठून आपल्या प्रकृतीला योग्य व्यायाम करावा. चालणे, सायकलिंग, योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम यापैकी कोणताही एक व्यायाम करावा. त्यानंतर सर्व अंगाला तेल लावून स्नेहन करावे. स्नेहनासाठी तीळतेल वापरावे. गुलाब, चंदन, अगरू, त्रिफळा या द्रव्यांनीयुक्त उटण्याचा अंघोळीसाठी वापर करावा. यामुळे शरीराला लावलेले तेल निघून जाईल व सुगंधी वासामुळे शरीर व मन प्रसन्न राहील. अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, पायमोजे, हातमोजे, कानटोपी, शाल, स्कार्फ यांचा वापर करावा. नेहमी उबदार कपडे घालावेत. सकाळी कोवळे ऊन पडल्यानंतर थोडा वेळ उन्हामध्ये बसावे. यामुळे शरीराला ’ड’ जीवनसत्त्व मिळते व थंडीपासून संरक्षण होते. या ऋतूमध्ये दिवसा झोपू नये, तसेच जागरण करू नये.

आयुर्वेदिक उपचार : या ऋतूत आरोग्य चांगले राहते, परंतु अति थंडीमुळे शरीरामध्ये कफसंचय होऊन सर्दी, खोकला झाल्यावर सितोपलादी चूर्ण, वासावलेह, तालिसादी चूर्ण अशाप्रकारची औषधे घ्यावीत. चहाऐवजी आयुर्वेदिक चहा (काढा) घ्यावा. गूळ, आले, तुळस, गवती चहा यांचा काढा घ्यावा. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्दी-खोकला, ताप असे आजार उद्भवत नाही. पंचकर्म उपचारांमध्ये स्नेहन, स्वेदन ही पूर्व कर्मे तर शिरोधारा, नस्य ही कर्मे करणे लाभदायक ठरते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश व शतावरी कल्प नियमित घ्यावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा