आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

मांसाहार करणार्‍यांनी या ऋतूत मांसाहार बनविताना मसाल्यांचा वापर कमी करावा. पचनशक्तीचा विचार करून कमी मात्रेत मांसाहार करावा. ग्रीष्म ऋतूत उष्णतेमुळे व बल कमी असल्यामुळे विविध विकारांची लागण होऊ शकते. हे टाळण्यासाठी शिळे अन्न खाऊ नये. नेहमी ताजा व सकस आहार घ्यावा. अति मसाला व तळलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण हे पदार्थ शरीरामध्ये अजूनच उष्णता निर्माण करतात. त्यामुळे पित्ताचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ होणे, अपचन, हातापायांची आग होणे, अंग गरम लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

पिण्यासाठी पाणी उकळून, गाळून प्यावे. या ऋतूमध्ये माठातील पाणी प्यावे. शक्यतो फ्रीजमधील पाणी पिण्यासाठी वापरू नये. वाळा, मोगरा, चंदन, गुलाब, जाई-जुई या फुलांनी सुगंधित असलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. माठामध्येही फुले किंवा वाळा टाकावा. या ऋतूमध्ये अनेक साथीचे आजार होऊ शकतात. ते होऊ नये याकरिता पाणी उकळून प्यावे. या ऋतूत शीत पदार्थ खाण्याची इच्छा होते, म्हणून सहसा घरी तयार केलेले आईस्क्रीम खावे. तसेच वेगवेगळी सरबते, फळांचा रस प्यावा.

विहार : सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे शरीरास सारखा घाम येत असतो. यावेळी पंख्याची हवादेखील गरम येत असते. पंखा, एसी यांची हवा शक्यतो घेण्याचे टाळावे. कारण या हवेमुळे शरीरात वातप्रकोप होतो. असह्य उष्णतेमुळे जर पंखा, एसी यांची हवा घ्यावी लागली, तर एकदम अंगावर हवा घेऊ नये. शक्यतो याकरिता खिडक्यांना वाळ्याचे पडदे बसवावेत. तसेच छतावर वाळ्याचे अस्तर टाकावे. यावर थोड्या थोड्या वेळाने पाणी टाकले, की आपोआपच थंड हवा निर्माण होते. या ऋतूत सतत घाम येत असतो. म्हणून कपडे मऊ, हलके व सुती घालावेत. जाडसर व नायलॉनचे कपडे वापरू नयेत. अंतर्वस्त्रे सुती वापरावीत. नायलॉनच्या कपड्यांमध्ये घाम अडकून घामोळे येणे, खाज येणे, फंगस निर्माण होणे असे आजार उद्भवतात.

रात्रीच्या वेळी थंड हवा मिळण्यासाठी अंगणात, गच्चीवर किंवा घराच्या गॅलरीमध्ये झोपावे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना ऊन लागू नये म्हणून सनकोट, स्कार्फ, गॉगल, सनस्क्रिन लोशन यांचा वापर करावा. त्वचेला, चेहर्‍याला आवर्जून सनस्क्रिन लोशन लावावे. कारण उन्हामुळे घामोळे, त्वचाविकार होऊ शकतात. तसेच संपूर्ण शरीराची आग होणे, चक्कर येणे इत्यादी त्रास होतात. म्हणून उन्हापासून त्वचेचे संरक्षण करावे.

रात्री झोपताना तळपायांना काशाच्या वाटीने तेल लावून मसाज करावा. यामुळे संपूर्ण शरीराची आग कमी होते. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावेत. किंवा गुलाबजल कापसात भिजवून डोळ्यांवर ठेवावे. या ऋतूमध्ये रात्र लहान व दिवस मोठा असल्याकारणाने, तसेच शरीराचे बल कमी असल्याने दिवसा झोप घेण्यास हरकत नाही. इतर ऋतूंमध्ये दिवसा झोप निषिद्ध सांगितली आहे.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा