तपासाबाबत संशय, फिर्यादी महिलेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
नगर – घरफोडी करणारा आरोपी पोलिसांनी पकडला, त्याने चोरी केल्याचे कबूल करून सोने सोनाराला विकले असल्याचे सांगितले. पोलिसांनी सोनाराकडे चौकशी केली परंतु सोनार म्हणतो आता माझ्याकडे सोने नाही. अशी उत्तरे तोफखाना पोलिसांकडून मिळत असल्याने त्यांचा तपास संशयास्पद आहे. त्यामुळे पोलिसांना योग्य तपास करायला लावून चोरीतील सोने हस्तगत करावे अशा मागणीचे निवेदन फिर्यादी असलेल्या शिक्षिकेने पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. श्रीमती आशा विजय साके (रा शिवाजीनगर, कल्याण रोड) यांच्या घरी कोणी नसताना दि. २० सप्टेबर रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याबाबत साके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत तोफखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटक आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली व चोरलेले सोन्याचे दागिने सोनाराला विकले असल्याचे सांगितले. पोलीसांनी सोनाराला ताब्यात घेतले. परंतु सोन्याची रिकव्हरी झाली नाही असे सांगण्यात आले. सोनार माझ्याकडे सोनेच शिल्लक नाही असे म्हणतो. असे पोलीसांकडून फिर्यादी साके सांगण्यात आले. तसेच त्या सोनाराला मरेपर्यंत तर आम्ही मारू शकत नाही असे त्यांना सांगण्यात आले. पोलीस जर अशी उत्तरे देत असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागावा, असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. आशा साके यांच्या पतीचे २००७ मध्येच निधन झालेले आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेल्या दागिन्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांच्या योग्य तपासाची अपेक्षा आहे. परंतु पोलिसांची अशी उत्तरे ऐकून त्या हतबल झाल्या आहेत. या गुन्ह्याचा योग्य रीतीने तपास व्हावा अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. जर चोर सापडला सोनार सापडला तर सोने हस्तगत व्हावे अशी मागणी त्यांनी केली.