नगर – भिंगार जवळील वडारवाडी येथे नगर – पाथर्डी रोडलगत असलेले मेडिकल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील ड्रॉवरमध्ये कर्मचार्यांच्या पगारासाठी ठेवलेली २८ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, २ चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. वडारवाडी परिसरात सह्याद्री हॉस्पिटलजवळ वसीम खान यांच्या मालकीचे सिटी पॉईंट नावाचे मेडिकल दुकान आहे. रविवारी (दि.२९) रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी व कामगारांनी दुकान बंद करून ते घरी गेले. सोमवारी सकाळी जेव्हा वसिम खान हे दुकान उघडण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना दुकानाच्या शटरचे लॉक तुटलेले दिसले. त्यांनी दुकानात पाहणी केली असता सर्व औषधे, गोळ्यांचे बॉस अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी दुकानातील ड्रॉवर पाहिल्यावर त्याचेही लॉक तुटलेले व ड्रॉवर उघडे असल्याचे दिसून आले. या ड्रॉवरमध्ये वसीम खान यांनी कामगारांचा पगार करण्यासाठी २८ हजारांची रोकड ठेवलेली होती. ती त्यांना दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात पहाटेच्या सुमारास तोंडाला कापड गुंडाळलेले २ चोरटे दुकानाचे शटर उचकटवून आतमध्ये घुसताना व चोरी करताना दिसून आले. याबाबतची माहिती वसीम खान यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी पोलिस ठाण्यात वार्षिक तपासणी सुरु असल्याने तुम्ही नंतर फिर्याद द्यायला या, असे सांगत फिर्याद न घेताच त्यांना माघारी पाठविले असल्याचा आरोप दुकान मालक वसीम खान यांनी केला आहे. याच परिसरातील मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी १५ दिवसांपूर्वी चोरून नेलेली आहे. तसेच भिंगारमधील विनोद पोखरणा यांचे विनोद मेडिकल चोरट्यांनी फोडले होते. त्यातही २ चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. मात्र अद्याप या चोरट्यांचा तपास लागलेला नाही.