स्मार्ट विद्युत मीटरची सक्ती म्हणजे सामान्य जनतेचे ‘आर्थिक शोषण’

0
94

विद्युत महावितरण विरोधात आम आदमी पार्टी जनआंदोलन उभारणार

नगर – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर लावण्यास करण्यात आलेल्या सक्तीला आम आदमी पार्टीच्या वतीने कायमचा विरोध दर्शविण्यात आला आहे. सदरचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आपच्या वतीने जिल्हाधिकारी व विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांना देण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. विद्या शिंदे, उपाध्यक्ष अंबादास जाधव, महासचिव दिलीप घुले, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सामल, मीडिया सहसंयोजक गौतम कुलकर्णी, युवा आघाडी उपाध्यक्ष विजय लोंढे, ऑफिस इन्चार्ज नामदेव ढाकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्मार्ट विद्युत मीटरची करण्यात आलेली सक्ती राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आर्थिक शोषण करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा आरोप आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी केला आहे. खाकाळ म्हणाले की, स्मार्ट विद्युत मीटरच्या निर्मिती व जोडण्याची किंमत ६ हजार रुपये प्रति मीटर अपेक्षित आहे. मात्र या मीटरच्या किमतीत दुप्पट वाढ करून १२ हजार रुपये प्रति मीटर दराने नागरिकांकडून वसुल करण्यासाठीचे कंत्राट खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. भांडवलवादी कंपन्यांना फायदा व्हावा, या हेतूने शासनाने ही योजना आखली आहे. ग्राहकांना प्रीपेड स्वरूपात विद्युत बिलाचे पैसे भरून ठेवण्यास भाग पाडून, महाराष्ट्राच्या जनतेचे आर्थिक शोषण करू पाहणार्‍या बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजनेला आम आदमी पार्टी कायम विरोध राहणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. खाकाळ यांनी विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना शहरात जनतेला पूर्ण माहिती न देता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचे सांगितले. सध्या दिल्लीगेट, तेलीखुंट या परिसरात काही ठिकाणी मिटर लावले आहेत आणि संपूर्ण शहरात लावणार आहे या पुढे विद्युत स्मार्ट मीटर हे शहरात लावू नये, यावर अधीक्षक अभियंता यांनी ते ऐच्छिक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करुन सांगितले. जर ते ऐच्छिक आहे आणि पूर्ण माहिती न देता लावले जात आहे, तर पुढे जाऊन गोरगरीब जनतेचे आर्थिक शोषण झाले तर याला जबाबदार कोण? असल्याचा प्रश्न उपस्थित केला. याबाबत अधीक्षक अभियंता यानी वरिष्ठ पातळीवर कळविण्याचे उत्तर दिले. अ‍ॅड. विद्या शिंदे यांनी लोकसभा आणि विधान सभेच्या अगोदर स्मार्ट मीटर लावले जाणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणूक संपताच हे मीटर लावून जनतेची लूट करण्याचा विद्युत महावितरणचा डाव असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शहरात स्मार्ट विद्युत मीटर बसविण्याचे थांबवले नाही, तर जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.