जिल्हा मूर्तीकार संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन; नाव नोंदणी करण्याची आयुत यशवंत डांगे यांची सूचना
नगर – पीओपी मुळे कुठलेही प्रदूषण होत नसून महापालिकेच्या वतीने होणारी कारवाई त्वरित थांबवावी अशा आशयाचे निवेदन अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना दिले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर, उपाध्यक्ष सुशील देशमुख, संतोष रायपिल्ली, भाजपचे कार्यकारणी सदस्य वसंत लोढा, केतन सोनवणे, संजय देवगुणे, संदीप सुसरे, ज्ञानेश्वर राजापुरे, सुवास ठाकूर, विवेक लोटके, उदय अनभुले आदींसह गणेश मूर्तिकार उपस्थित होते. मूर्तीकारांनी संघटनेने यापूर्वी महानगरपालिकेला पी.ओ. पी. प्रदूषण करत नसल्याचे पुरावे सादर केलेले आहेत. तसेच इतर १६० पानी कागदपत्रांसह शास्त्रज्ञांच्या ’डोळस पर्यावरण’ ह्या पुस्तकासह सर्व पुरावे सादर केलेले असून दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये २७/७/२०२४ रोजी पी.ओ.पी. संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले होते की, पी.ओ. पी. मुर्तीचे उत्पादन आणि विक्रीवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. त्याच वेळी मुर्तीकार संघटनेने आमचे म्हणणे व मागण्या या बाबत महानगरपालिकेने सी.पी.सी.बी. आणि एम.पी. सी. बी. यांना कळवावे असे अर्जात नमुद केलेले होते. महानगरपालिकेने न्यायालयाकडून आलेल्या तसेच एम.पी.सी.बी. कडून आलेल्या आदेशाचे पत्र मूर्तिकारणा दिलेले नाही.
सर्वत्र गणेश विसर्जन हे कृत्रिम तलावात होत असतांना प्रदुषणाचा खोटा बहाणा करून जबरदस्ती पी.ओ.पी. बंदी लादण्यात येत आहे. मुर्तीकारांना बेरोजगारीच्या संकटात लोटण्यात येत आहे. इतर कंपन्यांकडून नद्यांमधे केमिकल युक्त पाणी दररोज सोडले जाते. तसेच उस कारखान्याच्या मळीयुक्त पाण्याचाही त्यात समावेश असतो. आणि महत्वाचे म्हणजे शहरी वस्तीतील सांडपाणी, ड्रेनेजचे पाणी सर्रास दररोज नद्यांमध्ये सोडले जाते त्या विषयी प्रदुषणाची गंभीर समस्या रोज उद्भवत असतांना आमच्या मुर्त्यांच्या एक दिवसीय विसर्जनाला का टार्गेट केले जाते? पी.ओ. पी. च्या गणेशमुर्ती दरवर्षी जास्तीत जास्त प्रमाणात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, या राज्यात वितरीत होतात. तेथे कुठल्याही प्रकारची बंदी नाही. मग आमच्यावर बंदीची टांगती तलवार का? इतर राज्यातील व्यापार्यांच्या ऑर्डर्स पूर्णपणे देण्यासाठी पी.ओ. पी.च्या मुर्ती बनवणारच आहोत आणि बनवाव्याच लागतील. तो आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. संविधानाने तसा व्यवसायाचा हक्क आम्हाला दिलेला आहे. आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील मुर्तीकार आहोत. आणि सर्वसामान्यांना परवडणार्या पी.ओ.पी. च्या गणेशमुर्ती वर्षभर बनवित असतो. त्यावरच आमच्या हजारो कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नव्या जाचक अटींमुळे पी.ओ.पी. मुर्तीवर बंदी आल्यास आम्ही आमच्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे गणेश मूर्ती कारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी संघटनेने चर्चा करून त्यांना पीओपीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे पुरावे सादर करून गणेश मूर्तीकारावर होणारी कारवाई थांबवावी अशी मागणी केली. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की मूर्तिकारांनी ही प्रशासनाला सहकार्य करावे शहरातील सर्व मूर्तिकारांची महानगरपालिकेत नाव नोंदणी करावी जेणेकरून मनपाच्या वतीने मूर्तिकारांना सुविधा देण्यास मदत होईल. यावेळी भाजपचे कार्यकारणी सदस्य वसंत लोढा म्हणाले की, यापूर्वीही जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने महानगरपालिकेकडे पीओपीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे पुरावे सादर केले आहेत, तरीही महानगरपालिकेने मूर्तिकार संघटनेवर कारवाईचा बडगा उपसला आहे. शहरातील गणेश मूर्तींना देशभरात मोठी मागणी असते. गणेश मूर्ती ह्या देशभरात प्रसिद्ध आहेत अनेक कुटुंब यावर आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महापालिकेने गणेश मूर्तिकारांवर होणारी कारवाई थांबवावी, असे ते म्हणाले.