नगर – राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदॠषिजी महाराज साहेब यांच्या पदस्पर्शाने शहरातील पवित्र स्थान आनंदधाम येथे धर्मप्रेमी श्रद्धाशील श्रावक श्राविकांना चातुर्मासिक धर्म आराधना करण्यासाठी कर्नाटक गज केशरी श्री गणेशलालजी म. सा. यांच्या सुशिष्या, महाराष्ट्र प्रवर्तिनी श्री प्रभाकंवरजी म. सा. यांच्या सुशिष्या तथा आचार्य सम्राट श्री शिवमूनिजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनॠषिजी म. सा.यांचे आज्ञानुवर्तीनी उपप्रवर्तनी श्री किरणसुधाजी म. सा.आदि ठाणा ८ यांचा आनंदधाम येथील वर्ष २०२६ चातुर्मास घोषित करण्यात आला आहे. साध्वीवृंदांचा आनंदधाम येथे सन २०२६ चा मंगलमय चातुर्मास होणार आहे. संपूर्ण भारतभर जैन धर्माचा प्रचार प्रसार करून त्यांनी अनेक भाविक भक्तांना धर्म आचरण बाबत जागृत करुन मोलाचे मार्गदर्शन केले आहे. श्रमण संघास त्यांचे अनमोल मार्गदर्शन नेहमीच मिळते याबद्दल त्यांना श्रमण संघीय उपप्रवर्तनी ही पदवी देण्यात आली असून त्यांचे लाखो भाविक भक्त आहेत. महाराज साहेबांचा जीवन परिचय प्रेरणादायक आहे. धर्म आराधना कशी असावी, ध्यान साधना कशी करावी, जीवन कसे जगावे याबाबत स्वाध्याय करुन त्यांनी आपले संयम जीवन सार्थ केले आहे. त्यांना गुरुदेवांचा व गुरुमातांचा आशीर्वाद, सानिध्य, मार्गदर्शन मिळालेले आहे. धर्मप्रेमी श्रद्धाशील श्रावक श्राविकांना चातुर्मासिक आराधना करण्यासाठी या साध्वीजींचे बहुमूल्य मार्गदर्शन व विविध धार्मिक कार्यक्रमाचा, प्रवचनाचा लाभ होणार आहे. याबाबत खास युवक युवती व महिलांकरिता या चातुर्मासात त्यांचे अनमोल ज्ञान व मार्गदर्शन अहिल्यानगरवासीयांना मिळणार आहे, असे श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी सांगितले.