मुख्यमंत्री साहेब, या ‘आका’ पासून आमचं अहिल्यानगर शहर वाचवा हो

0
106

ताबेमारीविरुद्ध निवेदने देवून स्टंटबाजी; आका स्वतःला अहिल्यानगरचा बाप समजू लागला आहे काय? मुख्यमंत्री फडणवीसांना किरण काळेंचे जाहीर खुले पत्र

नगर – बीड येथील संतोष देशमुख हत्याकांडानंतर आ.सुरेश धस यांनी ’आका’वर
आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यानंतर आता अहिल्यानगर शहरामध्ये देखील एक ’आका’
असून या आकावर कारवाई करण्याची मागणी करणारे जाहीर खुले पत्र मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लिहिले आहे.
काळे यांनी पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदय, कधी काळी अहिल्यानगर
शहराची तुलना कैरो, बगदादशी व्हायची. मात्र राजकारणाच गुन्हेगारीकरण, बाजारपेठ,
व्यापार्‍यांना उद्ध्वस्त करणारे षडयंत्र, प्रत्येक घटकाला वेठीस धरण्याचे किळसवाणे प्रकार,
स्वकष्टाच्या जमिनी, प्लॉटवर होणारी ताबेमारी, ताबेमारी करणार्‍या राजकीय ’आका’ च्या
ताबा गँग, ’जे गँग’, मनपासारख्या शहराच्या लाईफलाईन आडून सुरू असणारी लूट, अवघ्या १२०९
रुपयांत पे अँड पार्किंगच्या नावाखाली सबंध शहराचा होणारा लिलाव यामुळे अहिल्यानगरकर अस्वस्थ
आहेत. नगरकरांना अस्वस्थ करणारा ‘आका’ आता ताबेमारीच्या विरोधात खोट्या-नाट्या वल्गना करू
लागला आहे. ’मी नाही त्यातली कडी लावा आतली’ या उक्तीप्रमाणे वागू लागला आहे.
मुख्यमंत्री साहेब, आमच्या अहिल्यानगरला दृष्ट लागावी असा एक ’आका’ ’आ वासून’ आक्राळ
विक्राळ रूप आता धारण करू पाहत आहे. दहशत, गुंडगिरी, दबाव तंत्र, प्रचंड पैशांचा वापर यातून
एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा सार्वत्रिक निवडणुका ‘आका’ने जिंकल्या खर्‍या, पण आजही
हजारोंचा वर्ग या ‘आका’ पासून शहराला मुक्तता मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहे. गैरमार्गाने मिळवलेल्या
सत्तेमुळे ‘आका’ आता मस्तवाल होऊ पाहत आहे. अहो मुख्यमंत्री साहेब, या ’आका’ पासून आमचं
अहिल्यानगर शहर वाचवा हो, अशी आर्त हाक हतबल नगरकर भीतीपोटी जाहीर जरी बोलू शकत नसला
तरी दबया आवाजात देत आहे.
नुकत्याच निवडणुका पार पडल्या. त्यानंतर मात्र या ‘आका’ने अनेकांना वेठीस धरने सुरू
केले. ताबा मारणार्‍यांच्या यादीमध्ये कायम या ‘आका’च्याच पंटर लोकांचीच नावे कशी काय येतात?
एखादा पीडित पोलीस स्टेशनला गेला की तो पोहोचण्यापूर्वीच या ‘आका’चा फोन कसा काय गेलेला
असतो? ज्या ‘आका’ची जे गँग एसपी ऑफिसवर हल्ला करू शकते, त्या पोलीस स्टेशनला आपल्याला
काय न्याय मिळणार? या विचाराने अहिल्यानगरवासीयांनी हतबल का होऊ नये? आम्हाला पोलीस
प्रशासनाला दोष द्यायचा नाही. पण सत्तेचा गैरवापर करून जर ‘आका’ पोलीस दलाचे खच्चीकरण करत
असेल तर पोलिसांची इच्छा असूनदेखील ते पीडितांना न्याय कसा काय देऊ शकतील? ताबासम्राटच
आता स्वयंघोषित कार्यसम्राट म्हणून पोलिसांना ताबेमारीच्या विरुद्ध निवेदने देण्याची स्टंटबाजी करून,
सर्वसामान्य अहिल्यानगरवासियांचा जणू काही मी त्या गावचाच नाही, असे भासवत बुद्धीभेद करण्याचा
केविलवाणा प्रयत्न करीत आहे. पण अहिल्यानगरवासीय दूधखुळे नाहीत, हे ‘आका’ने लक्षात घ्यावे.
मागील काही वर्षांमध्ये विविध भागांमध्ये हृदयद्रावक हत्याकांडं झाली. यामध्ये या ‘आका’शी
निगडितच लोकांचाच संबंध कसा काय असतो? ‘आका’ने या शहरात अनेकांचा संतोष देशमुख केला
तरी त्याचा बाल बाका का नाही होत? तीन महिने तुरुंगवारी करून आलेला ‘आका’ उजळ माथ्याने
फिरतोच कसा? एका आयुर्वेदाचार्यांच्या नावाने असलेली नामांकित संस्था की ज्याची भूमी महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे, त्यावर देखील पद्धतशीरपणे कसा काय
ताबा मारला जातो? न्याय मागायला जाणार्‍या पिडीतावरच ‘आका’ आणि त्याची गँग कसा
काय अत्याचार करते?
आमच्या जैन समाजाच्या ऋषीतुल्य, गुरुतुल्य महानुभवांच्या विश्रांतीचे पवित्र ठिकाण
असणार्‍या जागेवर ताबा मारत आपले राजकिय कार्यालय थाटण्याची या ‘आका’ची हिंमत
कशी काय होते? बुरुडगाव रोडवरील ज्या चौकात एका जैन बांधवाला मारहाण करून
‘आका’ने हिंसा केली, त्याच अहिंसा चौकात या ‘आका’ची छाती काढून उभे राहण्याची
हिंमत कशी होते? तत्कालीन एसपी विश्वास नांगरे पाटील यांनी ‘आका’चा केलेला पोलिसी
पाहुणचार ‘आका’ कसा काय विसरतो? व्यापार, उद्योग यामुळे दगडाखाली हात असणार्‍या
आमच्या बांधवांच्या हतबलतेचा ‘आका’ पुरेपूर गैरफायदा घेत नाही काय? असे अनेक प्रश्न काळे यांनी
पत्रात उपस्थित केले आहेत.
पत्रात पुढे म्हटले आहे की, निवडणूक संपली आणि ‘आका’ने भगवी टोपी, भगवा पंचा घालत
स्वतःला ’हिंदू जनसेवक’ अशी बिरुदावली लावून घेतली. शेळीने वाघाचं कातडं पांघरून वाघ झाल्याचा
आव आणावा एवढं तर बेगडी ‘आका’चं हिंदुत्व आहे. हे म्हणजे ’लबाड लांडग ढोंग करतय हिंदुत्वाचं सोंग
करतय’ असं आहे. या आडून ‘आका’ मतांची पोळी भाजतोय. थोडं थांबा. योग्य वेळ आली की, या
‘आका’च्या अंगावरची वाघाची बेगडी झूल नगरकर काढून उखडून फेकतील. तेव्हा त्या खाली लपलेल
खरं ओंगळवाण रूप समोर येईल.
शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख एवढी. मालमत्तांची संख्या १ लाख ३१ हजार. नोंदणीकृत
वाहनांची संख्या ३ लाख ५० हजार एवढी. असे असतानाही मात्र पे अँड पार्कच्या नावाखाली ‘आका’ने
मनपा प्रशासनाला हाताशी धरून शहरातील मोयाचे ३५ रस्ते आणि मनपाचे काही भूखंड प्रतिदिन
अवघ्या १,२०९ रुपयांना विकत घेत सबंध शहरच कवडीमोड किंमतीला विकत घेण्याची हिंमत कशी
काय केली? कोट्यावधी रुपयांचा मलिदा या आकाला आपल्या टोळ्या पोसण्यासाठी लाटायचा आहे.
तिसर्‍यांदा गैरमार्गाने निवडून आल्यामुळे हे ‘आका’ आता स्वतःला अहिल्यानगर शहराचा बाप समजू
लागले आहेत काय?
हे शहर फकीरांची वस्ती आहे. अनेक दादा आले आणि गेले. ’समय बडा बलवान है’ अशी
म्हण आहे. पापाचा घडा भरून ओसंडून वाहू लागला की तो पालथा होतोच. योग्य वेळी या ‘आका’चा
देखील बिमोड अहिल्यानगरकर नक्कीच करतील. त्यासाठी मी, किरण काळे कटीबद्ध आहे. विधानसभा
निवडणुकीतच ‘आका’ला धूळ चारली असती. पण काँग्रेसला संधीच मिळाली नाही. म्हणून हा ‘आका’
वाचला. नाही तर याच्या जुलमी राजवटीतून अहिल्यानगरवासियांची याच वेळी कायमची मुक्तता झाली
असती. २०२४ जरी निसटल असले तरी २०२९ कोणत्याही परिस्थितीत निसटू देणार नाही.
मुख्यमंत्री साहेब, राज्याची सत्ता तुमच्या हाती आहे. अहिल्यानगर हे तुम्ही मुख्यमंत्री असणार्‍या
महाराष्ट्राचाच भाग आहे. जमलं तर अनेकांचा संतोष देशमुख करणार्‍या आणि तमाम नगरकरांना कायम
दहशत, गुंडगिरीच्या धारदार टोकावर उभे करत वेठीस धरणार्‍या आकाच्या मुसया आवळता आल्या
तर नक्की आवळा. नाहीतर जनता जनार्दन सुज्ञ आहेच. तुमची अपूर्ण कामे अहिल्यानगरवासीय लोकशाही
मार्गाने पूर्ण करतील, असा इशारा किरण काळे यांनी आपल्या पत्रात दिला आहे.