नगर – शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी मनपाने फ्लेसमुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतले आहे. यात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. फ्लेस लावण्यास अटकाव करण्यासाठी प्रभागस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. फलक लावणार्या व्यक्ती, संस्थांसह फलकांवर ज्यांचे फोटो असतील, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा श्री.डांगे यांनी दिला आहे. फ्लेस बोर्ड लावल्या प्रकरणी मागील महिनाभरात १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता फ्लेस बोर्ड लावणार्या व्यक्तींवर अधिक प्रभावी व कठोर कारवाई हाती घेण्यात येत आहे. नागरीक, राजकीय कार्यकर्ते, संस्था, संघटनांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा असे व इतर फलक विनापरवाना लावू नयेत. अशा पद्धतीने फलक लावणार्या व्यक्तींवर लक्ष ठेऊन त्यांना अटकाव करण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. यात माजी नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश असणार आहे. नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन फ्लेस मुक्त अहिल्यानगर करण्यासाठी, शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यशवंत डांगे यांनी केले आहे. यापुढे विनापरवाना फलक आढळल्यास फलक लावणारे व त्यावर ज्यांचे फोटो आहेत, अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे, तसेच शहरात विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परवाना क्रमांकशिवाय फ्लेस छपाई करू नयेत, अशा सूचना यशवंत डांगे यांनी छपाई व्यावसायिकांना दिल्या आहेत. फ्लेस छपाई करताना फ्लेसच्या कोपर्यात परवाना क्रमांक टाकणे यापुढे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना क्रमांक न टाकता फ्लेस छपाई करणार्या व्यावसायिकांवरही महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही यशवंत डांगे यांनी सांगितले.