बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य, शेतकरी, हमालांचे प्रचंड हाल

0
80

नगर – एकीकडे देशभरात स्वच्छता ही सेवा पंधरवडा सुरु असून नगरमध्येही महापालिका विविध भागात स्वच्छता अभियान राबवित आहे. स्वतः मनपा आयुक्त स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले आहेत. दुर्दैवाने महापालिका प्रशासन तसेच बाजार समिती प्रशासनाचे बाजार समितीच्या आवारातील घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातून दररोज बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना, हमाल मापाड्यांना तसेच व्यापाऱ्यांनाही जागोजागी साठलेल्या घाणीचा सामना करावा लागत आहे. पावसाने सर्व चिखल झाला आहे.

सर्व चिखल झाला आहे. पाण्याचे डबके साचलेले आहेत. शेतकऱ्यांना माल उतरवण्यासाठी जागा नाही. घाणीमुळे चांगला मालही खराब होत असल्याने मनपा तसेच बाजार समिती प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहिम राबवावी अन्यथा कचरा, गाळ बाजार समितीच्या कार्यालयात टाकला जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे तसेच स्वच्छतेच्या अभावी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला

मार्केट व परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संदेश कार्ले यांनी मंगळवारी (दि.२४) सकाळीच बाजार समिती गाठून परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांचे हाल पाहिल्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बाजार समितीत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देणे बाजार समितीचे काम आहे. याशिवाय महापालिकेनेही वेळोवेळी स्वच्छता करून रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. मात्र सध्या मनपा व बाजार समिती प्रशासन दोघांनीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

या परिसरातील घाणीमुळे, चिखलामुळे अनेक शेतकरी आजारी पडत आहेत. हमालांनाही काम करताना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. मनपा आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरुन स्वच्छता करीत असल्याचे फोटो पेपरमध्ये झळकतात. मग त्यांना बाजार समितीचे आवार दिसत नाही का? या परिसरातील कचरा, घाणीमुळे शेतमालाचे, भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. तीन दिवसात बाजार समितीच्या आवारातील गाळ काढून स्वच्छता करावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा कार्ले यांनी दिला आहे.